सासू आणि सून यांचं नातं हे काहीसं मतभेदांवर आधारलेलं असतं. बहुतांशवेळा सासू सुनेवर किंवा सून सासूवर विश्वास ठेवताना किंवा तिला पाठिंबा देताना दिसत नाही. सासू आणि सून म्हणजे खटके उडणारच हे जवळपास समाजाने गृहीतच धरलं आहे. या सगळ्याला छेद देणारी एक घटना समोर आली आहे. आपल्या सुनांना त्रास देणाऱ्या, त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या मुलाला शिक्षा व्हावी म्हणून एका आईने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आईने मुलाच्या विरोधात साक्ष दिली आणि सुनांना न्याय मिळवून दिला. यानंतर न्यायालयात न्यायाधीशांनी रामचरितमानसच्या ओळी म्हणत निर्णय दिला. जोधपूरमध्ये ही घटना घडली आहे.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

जोधपूरच्या पीपाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक गाव आहे. या गावातल्या कुटुंबाने २०२१ मध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यातला आरोप असा होता की आरोपीने कुटुंबातल्या लहान सुनेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या सुनेने आराडाओरडा केला तेव्हा आरोपीची आई जागी झाली आणि तिला पाहून मुलगा तिथून पळून गेला. आईने सुनेला काय झालं ते विचारलं असता तिने घडला प्रकार सांगितला. ज्यानंतर या कुटुंबातल्या मोठ्या सुनेने असं सांगितलं की तिच्याशीही गैरवर्तन केलं आहे. मोठ्या आणि लहान सुनेशी आपल्या मुलाने केलेलं गैरवर्तन पाहून आई चांगलीच संतापली होती. मात्र त्यावेळी ते बदनामी होईल हा विचार करुन गप्प राहिले. काही दिवस बरे गेले त्यानंतर या मुलाने पुन्हा एकदा लहान सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर लहान सुनेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

आरोपीच्या आईची साक्ष निर्णायक ठरली

या प्रकरणात आरोपीच्या आईची म्हणजेच या दोन्ही सुनांच्या सासूची भूमिका निर्णायक ठरली. आरोपीच्या आईने आपला जबाब पोलीस ठाण्यात नोंवदला. तसंच न्यायालयातही तिने मुलाच्या विरोधात साक्ष दिली. माझ्या मुलाने जे केलं आहे ते कृत्य माफ करण्यालायक नाही त्याला तुम्ही कठोरातली कठोर शिक्षा द्या असं आवाहनही या महिलेने न्यायालयाला केलं. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विविध कलमांखाली या मुलाला दोषी ठरवण्यात आलं आणि त्याला १० वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. तसंट ८५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

न्यायाधीशांनी रामचरितमानसच्या ओळींचा केला उल्लेख

या प्रकरणात मुलाविरोधात आईने साक्ष दिली आणि आपल्या सुनांचा बचाव केला ही बाब अधोरेखित करत शिक्षा सुनावत असताना जोधपूरच्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी रामचरितमानसच्या ओळींचा उल्लेख केला. ‘अनुजवधू भगिनी सुतनारी, कन्या सम एति चारि. एहि को देख कुदृष्टि से, ताहि बधे कछु पाप न होई’ लहान भावाच्या पत्नीकडे मोठ्या दिराने आपल्या मुलीप्रमाणे पाहिलं पाहिजे, तिच्यावर वाईट नजर जो टाकतो त्याला शिक्षा देणं हे काही पाप नाही असं न्यायाधीश म्हणाले.