मध्य प्रदेशातील नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर मंगळवारी संध्याकाळी एका आईने आपल्या आठ वर्षांच्या मुलीला धावत्या ट्रनेखाली ढकलले. यामुळे चिमुकली गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मुलीची मृत्यूशी झुंज सुरू
ट्रेनखाली आल्याने मुलीच्या डोक्याला, कमरेला, खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही झाला आहे. तिची प्रकृती खालावल्याने तिला भोपाळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिला सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.
मुलगी दुसरीत शिकत आहे
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ती मुलगी तिच्या आईसोबत पोलिसांत आली होती. तिची आई सरकारी कर्मचारी आहे. महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतर या मायलेकी दोघीच राहत होत्या. पतीच्या निधनानंतर त्याच्या जागेवर या महिलेला नियुक्ती मिळाली असून तिची मुलगी इयत्ता दुसरीत शिकत आहे.
नर्मदापुरम जीआरपीचे प्रभारी संजीव चौकसे यांनी सांगितलं की, घटनेपूर्वी आई आणि मुलगी जवळपास तीन तास प्लॅटफॉर्मवर होत्या. सायंकाळी ७.४० च्या सुमारास जेव्हा तामिळनाडू एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळ आली, तेव्हा त्या महिलेने अचानक मुलीला रुळांवर ढकललं. इंजिनाची धडक बसल्याने ही मुलगी प्लॅटफॉर्म आणि रुळांच्या मध्ये अडकली. तिला अनेक जखमा झाल्या असून ती वेदनेने प्रचंड विव्हळत होती. तसंच, या महिलेवरही गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय उपचार सुरू होते.
धडक बसल्यानंतर ट्रेन वरून जात असताना ही मुलगी रुळ आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकून बसली होती. ट्रेन रुळांवरून निघून जाताच इतर प्रवाशांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेत तिला बाहेर काढलं आणि तिला रुग्णालयात नेलं.
पीडित मुलगी जेव्हा रुळांवर पडली तेव्हा ती वेदनेने विव्हळत होती. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले लोक लागलीच तिच्या मदतीसाठी पुढे सरसारवले. मात्र, त्या मुलीला वाचवू नका, असं तिची आई म्हणत असल्याचं काहींनी ऐकलं.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिला कोणता मानसिक आजार आहे का या बाजूने तपास केला जाणार आहे. कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
