Nepal Mount Everest Helicopter Accident Indian Tourist Death : माउंट एव्हरेस्टच्या परिसरात दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधील सोलुखुंबू जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. या अपघातात न्यूझीलंडचा एक नागरिक जखमी झाला असून, दोन्ही हेलिकॉप्टरचे वैमानिकही किरकोळ जखमी झाले आहेत. फिशटेल एअर आणि डायनेस्टी एअर या दोन कंपन्यांच्या हेलिकाप्टरची एकमेकांना धडक बसल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. याबद्दलचे सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
सोलुखुंबू जिल्हा पोलीस कार्यालयाच्या माहितीनुसार, खुम्बू पासांग ल्हामु ग्रामीण नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये सकाळी सुमारे ८ वाजून ११ मिनिटांनी हा अपघात झाला. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही विमाने एकमेकांच्या अत्यंत जवळ येताना दिसली; त्यानंतर त्यांच्या रोटर ब्लेडचा एकमेकांशी संपर्क झाला आणि दोन्ही विमाने कोसळली. सोलुखुंबूचे पोलीस प्रमुख मौसम तामांग यांनी मृत भारतीय पर्यटकांची ओळख वसंत कुमार बाळारामारामाडू अशी पटवली. ते फिशटेल एअरच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.
भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा नागरिक जखमी
याच हेलिकॉप्टरमध्ये भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा नागरिक शैलेश कृष्णा पटेलही प्रवास करत होता. या दुर्घटनेत तो जखमी झाला. त्याला हेलिकॉप्टरने काठमांडू येथील मेडिसिटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्ही हेलिकॉप्टरचे वैमानिकही किरकोळ जखमी झाले असून, त्यांनाही पुढील उपचारांसाठी काठमांडूला हलवण्यात आले आहे.
दरम्यान, मृत वसंत कुमार यांचा मृतदेह लुक्ला येथील रुग्णालयात नेण्यात आला आहे. या अपघातात दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये मिळून किती प्रवासी होते, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अपघाताच्या कारणांचा तपास सुरू
दोन्ही हेलिकॉप्टरची धडक नेमकी कशामुळे झाली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनेची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये किती प्रवासी होते आणि दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
