मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजप सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी भोपाळ विधानसभेतील एका कार्यक्रमात ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ हे लोकप्रिय बॉलीवूड गाणे गायले. गाणे गात असतानाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर महानायक अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांना टॅग करून शेअर केलाय.

या व्हिडिओत दोन्ही नेते हातात माईक घेऊन जुगलबंदी करताना दिसत आहेत. त्यांच्यासह त्याठिकाणी आरोग्य मंत्री विश्वास कैलाश सारंग यांच्यासह इतर काही जण उपस्थित होते.  दोघंही उंच आवाजात संगीतावर ताल धरत गीत गाताना दिसत आहेत. गीत गाताना मधेच एका ठिकाणी विजयवर्गीय मुख्यमंत्र्यांचा हात धरून हवेत उंचावतात आणि उपस्थित इतर नेतेमंडळी गाणे गुणगुणताना ऐकू येत आहेत.

कैलाश विजयवर्गीय यांनीही हा व्हिडिओ शेअर केलाय. “युवा मोर्चात काम करताना अनेकदा हे गीत गायचो. आज पुन्हा एकदा भोपाळमधील भुट्टा पार्टीत हे गाणं ऐकलं आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या,” असं कॅप्शन त्यांनी व्हिडिओला दिलंय. दरम्यान, या भुट्टा पार्टीत विरोधी पक्षातील नेत्यांसह अनेक पत्रकारांनी हजेरी लावली होती. माजी मुख्यमंत्री कमल नाथ देखील उपस्थित राहिले होते.