विरोधी पक्षनेत्याचा मध्य प्रदेश विधानसभेत इशारा

भोपाळ : भाजप पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास २४ तासांत कमलनाथ सरकार पडेल, असा इशारा मध्य प्रदेश विधानसभेतील भाजपचे विरोधी पक्षनेते गोपाळ भार्गव यांनी बुधवारी दिला. त्यावर आपण कधीही शक्तिपरीक्षेस सामोरे जाण्यास तयार असल्याचे प्रत्युत्तर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले.

कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकार बहुमताअभावी कोसळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मध्य प्रदेशात काँग्रेसच्या कमलनाथ सरकारविरोधात मोर्चेबांधणीचे संकेत भाजपने दिले आहेत. मध्य प्रदेश विधानसभेत बुधवारी  सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप यांच्यात खासगी विमान वापरावरून खडाजंगी झाली. विधानसभेतील गोंधळामुळे पाच मिनिटे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू होताच विरोधी पक्षनेते गोपाळ भार्गव यांनी काँग्रेस सरकारला लक्ष्य केले. ‘भाजपच्या क्रमांक १ आणि क्रमांक २ च्या नेत्यांनी आदेश दिला तर कमलनाथ सरकार २४ तासांत पडू शकते,’ असे भार्गव म्हणाले. त्यावर कमलनाथ यांनी ‘तुमचे क्रमांक १ आणि २ चे नेते हुशार असून, त्यांना वस्तुस्थिती माहीत आहे’, असे प्रत्युत्तर दिले. आपले सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपलाच धक्का

मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्याचा इशारा भाजप नेत्याने दिला असताना विधानसभेत एका विधेयकावर दोन भाजप आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले. भाजप आमदार नारायण त्रिपाठी आणि शरद कोल यांनी फौजदारी कायदा सुधारणा विधेयक २०१९ वरील मतदानावेळी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला. त्रिपाठी आणि कोल हे याआधी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिल्याने भाजपला धक्का बसला आहे.