MP Minister brother Indarsingh Chouhan threatening a woman Janpad CEO in Alirajpur : मध्य प्रदेशातील एका विद्यमान मंत्र्याच्या भावाविरुद्ध अलिराजपूरमध्ये जनपद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला (CEO) धमकावल्याप्रकरण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने महिला अधिकाऱ्याला तिचे ‘दात तोडण्याची’ आणि ‘जिवंत गाडण्याची’ धमकी दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
आरोपीची ओळख इंदर सिंग चौहान अशी झाली असून, तो अनुसूचित जाती कल्याण विभागाचे कॅबिनेट मंत्री नागर सिंग चौहान यांचा भाऊ आहे. मंत्री चौहान यांनी तो आपला भाऊ असल्याचे मान्य केले असले तरी, आरोपांवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. “तो माझा भाऊ आहे आणि एफआयआरमध्ये त्याचे नाव आहे”, असं त्यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले.
भाजपा आमदार प्रीतम सिंह लोधी यांनी नुकतंच पोलीस अधिकाऱ्यांना धमकावलं होतं, त्यानंतर लगेचच ही घटना समोर आली आहे. मंत्री चौहान यांच्या भावाच्या या कृत्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यामध्ये तो दोन व्यक्तींनी रोखलेले असतानाही महिला अधिकाऱ्याच्या दिशेने धावून जाताना दिसत आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात २२ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, ही घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास जनपद पंचायत कार्यालयात घडली. पोलिसांनी इंदर सिंग चौहान विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३२, २२४, २२१ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
नेमकी घटना काय?
जनपद सीईओ प्रिया काग यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्या कर्तव्यावर असताना चौहान मुख्य गेटजवळ उभा होता. “मी वाहनातून उतरताच तो ‘मुख्यमंत्री कन्या विवाह योजने’तंर्गत अर्ज फेटाळल्याबद्दल जोरात ओरडू लागला”, असे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.
प्रिया काग यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, ज्या अर्जदारांनी आधीच लग्न केले आहे आणि अर्जासोबत लग्नाची खोटी पत्रिका जोडली आहे, त्यांचे अर्ज सरकारी नियमांनुसार फेटाळण्यात आले आहेत. मात्र, यामुळे चौहान अधिकच आक्रमक झाला. तक्रारीनुसार, चौहान म्हणाला, “मी तुझे दात तोडून तुला इथेच जिवंत गाडून टाकेन. या जनपदमध्ये सर्व काही माझ्या इच्छेनुसारच होईल. मला सांगणारी तू कोण?”
महिला अधिकाऱ्याने पुढे आरोप केला की, चौहानने त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा रस्ता अडवला. भीतीपोटी त्या कार्यालयाच्या मागील खोलीत गेल्या, तरीही तो त्यांच्या मागे तिथे आला. यापूर्वीही चौहानने त्यांच्या चेंबरमधील कॅमेरे काढून टाकले होते, असा दावाही त्यांनी केला आहे. या घटनेमुळे आपण कामाच्या ठिकाणी आणि घरीही असुरक्षित असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
