आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या मध्य प्रदेशमधील मंत्री उषा ठाकुर यांनी पुन्हा एकदा असच एक वक्तव्य केलं आहे. उषा ठाकुर यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढणाऱ्यांकडून १०० रुपये आकारणार असल्याचं म्हटलं आहे. सेल्फी काढणं हे फार वेळ खाऊ काम आहे तसेच यामुळे अनेकदा कार्यक्रमांना उशीर होतो असं सांगत उषा ठाकुर यांनी आता सेल्फीसाठी पैसे आकारण्याची घोषणा केलीय. हे पैसे भाजपाच्या पार्टी फंडमध्ये गोळा केले जाणार असल्याचंही उषा म्हणाल्या आहेत.

राजधानी भोपाळपासून २५० किमीवर असणाऱ्या खांडवा येथे पत्रकारांशी बोलताना उषा ठाकुर यांनी यासंदर्भातील दिली.  “सेल्फी काढण्यात फार वेळ वाया जातो. अनेकदा त्यामुळे आमचे नियोजित कार्यक्रम काही तास उशीराने सुरु होतात. त्यामुळेच आता माझ्यासोबत सेल्फी काढणाऱ्या प्रत्येकाला भाजपाच्या स्थानिक पक्ष निधीसाठी १०० रुपये द्यावे लागणार आहेत. हा निर्णय पक्षाचं हित लक्षात घेऊन घेण्यात आलाय,” असंही उषा ठाकुर म्हणाल्यात. विशेष म्हणजे ठाकुर यांचे सहकारी आणि कॅबिनेट मंत्री अशणाऱ्या कुनावर विजय शाह यांनीही २०१५ मध्ये सेल्फी काढणाऱ्यांकडून १० रुपये घेण्याची मागणी केली होती.

नक्की वाचा >> “२०२४ पर्यंत वाट पहावी लागणार नाही, मोदी सरकार कधीही कोसळू शकतं”; मोठ्या नेत्यानं व्यक्त केली शक्यता

पुष्पगुच्छ स्वीकारणार नसल्याची केली घोषणा…

सेल्फीसाठी पैसे आकारण्यासोबतच पुष्पगुच्छ आकारण्याऐवजी आपण पुस्तकं स्वीकारण्याचा निर्णय़ घेतला आहे.  फुलांमध्ये लक्ष्मी वसते म्हणून केवळ निष्कलंक असणाऱ्या भगवान विष्णूलाच फुलं अर्पण करावीत, असंही उषा ठाकूर यांनी पुष्पगुच्छ नाकारण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना म्हटलं आहे. “स्वागतासाठी फुलं देणाऱ्यांबद्दल बोलायचं झाल्यास आपल्या सर्वांना माहितीय की फुलांमध्ये लक्ष्मी वसते. त्यामुळेच निष्कलंक असणाऱ्या भगवान विष्णू शिवाय कोणीच फुलांचा स्वीकार करु नये असं मला वाटतं. म्हणून मी फुलं स्वीकारत नाही. तसेच पंतप्रधान मोदींनीही पुष्पगुच्छाऐवजी पुस्तकं स्वीकारणाचं आवाहन केलं आहे,” असं आपली भूमिका स्पष्ट करताना उषा ठाकुर यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> “या फोटोला कॅप्शन सुचवा…”; पेट्रोल पंपावरच मोदींसमोर लोटांगण घातल्याचा फोटो झाला व्हायरल

करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी यज्ञाचाही दिलेला सल्ला…

मे महिन्यामध्येही उषा ठाकुर यांनी करोनाचा नाश करण्यासाठी यज्ञ करण्याचं आवाहन केल्याने त्या चर्चेत आलेल्या. करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व लोकांनी सकाळी १० वाजता यज्ञ करावा असं उषा ठाकूर म्हणाल्या होत्या. “यज्ञ केल्याने करोनाची तिसरी लाट भारताला स्पर्शही करणार नाही. करोनाच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने सर्व तयारी केली आहे. सर्व प्रयत्न करुन आम्ही ही साथ आटोक्यात आणू,” असा विश्वास उषा यांनी व्यक्त केलाय. “सर्वांनी पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी यज्ञ करावं. आता १०,११,१२ आणि १३ तारखेला सकाळी १० वाजता यज्ञ करावा. यज्ञ ही चिकित्सा आहे. यज्ञ हे कर्मकांड आणि अंधश्रद्धा नाहीय तर पर्यावरण शुद्ध करण्याचा एक मार्ग आहे,” असं उषा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.