Raghav Chadha : आम आदमी पक्षाने खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. राघव चड्ढा यांच्या जागी आता खासदार अशोक मित्तल यांची राज्यसभेच्या उपनेते पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून का हटवलं? याबाबत अनेक सवाल विचारले जात आहेत.
राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आल्यानंतर चड्ढा यांनी ‘मला गप्प करण्यात आलं’ असं म्हटलं होतं. तसेच चड्ढा यांना उपनेते पदावरून हटवल्यानंतर आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता चड्ढा यांनी एक व्हिडीओ शेअर करत आम आदमी पक्षालाच इशारा दिला आहे.
“माझ्या विरोधात एक पूर्वनियोजित मोहीम चालवली जात आहे. एकसारखेच प्रश्न आणि एकसारखेच आरोप माझ्यावर केले जात आहेत. हा योगायोग नाही तर हा एक सुनियोजित हल्ला आहे”, असं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे. तसेच व्हिडीओच्या शेवटी बोलताना ‘घायल हूं, इसलिए घातक हूं’, असं म्हणत राघव चड्ढा यांनी ‘आप’ला मोठा इशाराही दिला आहे. तसेच आम आदमी पक्षाने केलेल्या तीन आरोपांनाही सडेतोड उत्तर दिलं आहे.
राघव चड्ढा यांनी काय म्हटलं?
“माझ्या विरोधात कालपासून एक पूर्वनियोजित मोहीम चालवली जात आहे. त्यामध्ये एकसारखी भाषा, एकसारखेच वक्तव्य आणि एकसारखेच आरोप. हा काही योगायोग नाही, तर हा एक सुनियोजित हल्ला आहे. मी आधी विचार केला की यावर काहीही उत्तर द्यायला नको. मात्र, नंतर मला असं वाटलं की जर मी गप्प राहिलो आणि एखाद्याने १०० वेळा वारंवार सांगितलेलं खोटं सुद्धा खरं वाटू लागतं. त्यामुळे मी आता असं ठरवलं की उत्तर देऊच”, असं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे.
“आम आदमी पक्षाने माझ्यावर तीन आरोप केले. या तीन आरोपांमुळे मला संसदेत बोलण्यापासून रोखलं असं त्यांनी म्हटलं. आता आम आदमी पक्षाच्या या तीन आरोपांबाबत मी सविस्तर बोलत आहे. पहिला आरोप, जेव्हा विरोधी पक्षाचे खासदार संसदेतून सभात्याग करतात तेव्हा मी (राघव चड्ढा) सभागृहात बसून राहतो, सभात्याग करत नाही, असा आरोप माझ्यावर करण्यात आला. पण मी सांगतो हे सगळं खोटं आहे. मी खुलं आव्हान देतो की एक अशी घटना किंवा एक असा दिवस दाखवा की जेव्हा विरोधकांनी सभात्याग केला आणि मी सभात्याग केला नाही”, असं राघव चड्ढा यांनी म्हटलं.
“आम आदमी पक्षाने दुसरा आरोप केला की, मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याच्या प्रस्तावावर मी स्वाक्षरी केली नाही. हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी मला आम आदमी पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी सांगितलं नाही. तसेच आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील १० सदस्यांपैकी ६ किंवा ७ सदस्यांनी देखील त्या प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली नाही. मग त्यामध्ये माझी काय चूक? तरीही मलाच का दोषी ठरवलं जातयं?”, असं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे.
“तसेच आम आदमी पक्षाने तिसरा आरोप माझ्यावर केला की मी घाबरलो आहे. वैयक्तिक स्वार्थाला प्राधान्य देतो असाही आरोप माझ्यावर झाला. मात्र, मी नेहमीच लोकांच्या आणि पक्षाच्या हितासाठी काम केलेलं आहे. मी संसदेत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी गेलेलो आहे. मी कोणता मुद्दा संसदेत मांडला नाही? जीएसटी, इनकम टॅक्स, पंजाबच्या पाण्याचा मुद्दा, दिल्लीतील हवेचा मुद्दा, सरकारी शाळा असे अनेक मुद्दे मी संसदेत मांडले आहेत”, असं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे.
