Raghav Chadha AAP Ban Rajya Sabha Speech Update: राज्यसभेचे खासदार आणि अभिनेत्री परिणिती चोप्राचे पती राघव चड्ढा यांनी गेल्या काही काळापासून संसदेत महत्त्वाचे प्रश्न उचलले होते. ब्लिंकिट डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मांडताना त्यांनी गिग कामगारांचा संघर्ष समोर आणला, काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना माघारी बोलावण्याच्या अधिकार, विवाहित जोडप्यांना एकत्र टॅक्स भरण्याचा अधिकार, असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. मात्र आता आम आदमी पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांना राज्यसभेत बोलण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे.

आम आदमी पक्षाने राज्यसभेच्या सचिवालयाला पत्र लिहून खासदार अशोक मित्तल यांची सभागृह उपनेतेपदी निवड करण्याची सूचना केली आहे. राघव चड्ढा यांना या पदावरून बाजूला करत असताना त्यांना भाषणासाठी वेळ देऊ नये, असे ‘आप’ने पत्रात म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात ‘आप’ने आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून चड्ढा यांना वगळले होते. अलीकडे राघव चड्ढा यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींवर मौन बाळगले होते. तसेच २०२५ साली दिल्ली निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर चड्ढा यांनी स्वतःला ‘आप’च्या धोरणांपासून दूर ठेवले होते. पक्षाचे विषय मांडण्याऐवजी त्यांनी समाजातील इतर वर्गाच्या विषयांना प्राधान्य दिले होते.

फेब्रुवारी महिन्यात दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात न्यायालयाने ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतरांना दोषमुक्त केले होते. त्यानंतरही खासदार राघव चड्ढा यांनी कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच सोशल मीडियावरही त्यांनी पोस्ट शेअर केली नाही. याबद्दल बरीच चर्चा झाली.

३७ वर्षीय खासदार राघव चड्ढा गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांपासून दूर होते. अरविंद केजरीवाल यांनी पक्ष कार्यालयात घेतलेली पत्रकार परिषद असो किंवा जंतर मंतर मैदानावर घेतलेल्या जन सभेलाही ते अनुपस्थित होते. याच सभेत केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती.

चार्टर्ड अकाऊंटंट असलेले राघव चड्ढा आपच्या स्थापनेपासून (२०१२) पक्षात कार्यरत होते. केजरीवाल यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. चड्ढा यांनी पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार म्हणून काम पाहिले होते. तर पक्षाच्या सर्वोच्च अशा राजकीय व्यवहार समितीचे ते सदस्य आहेत. इंडिया आघाडीच्या स्थापनेनंतर त्यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.