Raghav Chadha : गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा चर्चेत आहेत. या चर्चेच कारण म्हणजे आम आदमी पक्षाने खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून अचानक हटवलं. तसेच त्यांच्या जागी खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून का हटवलं? याबाबत वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षावर टीका केली आहे. शनिवारी राघव चड्ढा यांनी एक व्हिडीओ शेअर करत ‘घायल हूं, इसलिए घातक हूं’, असं म्हणत ‘आप’ला सूचक इशारा दिला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा राघव चड्ढा यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर करत आम आदमी पक्षाने केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
आम आदमी पक्षाने आरोप करत म्हटलं होतं की, राघव चड्ढा संसदेत पंजाबचे प्रश्न मांडण्यात अपयशी ठरले आहेत. दरम्यान, आम आदमी पक्षाने केलेल्या या आरोपाला आता राघव चड्ढा यांनी उत्तर देत आतापर्यंत संसदेत पंजाबमधील कोणकोणत्या विषयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याचा सविस्तर व्हिडीओ शेअर केला आहे.
तसेच त्या व्हिडीओला कॅप्शन देत राघव चड्ढा यांनी म्हटलं की, “हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यास भाग पडलेल्या ‘आप’मधील माझ्या सहकाऱ्यांसाठी हा एक छोटा ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है. तसेच माझ्यासाठी पंजाब केवळ चर्चेचा विषय नाही. ते माझं घर, माझं कर्तव्य, माझी माती, माझा आत्मा आहे.”
धुरंधर चित्रपटातील संवाद वापरून राघव चड्ढा यांचा ‘आप’ला इशारा
राघव चड्ढा यांना उपनेते पदावरून हटवल्यानंतर चड्ढा यांनी म्हटलं की, “माझ्या विरोधात एक पूर्वनियोजित मोहीम चालवली जात आहे. एकसारखेच प्रश्न आणि एकसारखेच आरोप माझ्यावर केले जात आहेत. हा योगायोग नाही तर हा एक सुनियोजित हल्ला आहे”, असं राघव चड्ढा यांनी म्हटलं. तसेच व्हिडीओच्या शेवटी बोलताना ‘घायल हूं, इसलिए घातक हूं’, असं म्हणत राघव चड्ढा यांनी ‘आप’ला मोठा इशाराही दिला.
“आम आदमी पक्षाने माझ्यावर तीन आरोप केले. या तीन आरोपांमुळे मला संसदेत बोलण्यापासून रोखलं असं त्यांनी म्हटलं. आता आम आदमी पक्षाच्या या तीन आरोपांबाबत मी सविस्तर बोलत आहे. पहिला आरोप, जेव्हा विरोधी पक्षाचे खासदार संसदेतून सभात्याग करतात तेव्हा मी (राघव चड्ढा) सभागृहात बसून राहतो, सभात्याग करत नाही, असा आरोप माझ्यावर करण्यात आला. पण मी सांगतो हे सगळं खोटं आहे. मी खुलं आव्हान देतो की एक अशी घटना किंवा एक असा दिवस दाखवा की जेव्हा विरोधकांनी सभात्याग केला आणि मी सभात्याग केला नाही”, असं राघव चड्ढा यांनी म्हटलं.
