पीटीआय, नवी दिल्ली, भोपाळ
मध्य प्रदेशात राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आणि कागदपत्रे वैध ठरलेले भाजपचे तिन्ही उमेदवार गुरुवारी बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक अधिकाऱ्याने काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज अवैध ठरवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी मीनाक्षी नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
निवडणूक अधिकारी अरविंद शर्मा यांनी गुरुवारी घोषणा केली की, भाजपचे तरुण चुघ, रजनीश अगरवाल आणि महेश केवट हे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. तिन्ही उमेदवारांनी भोपाळमध्ये विधिमंडळात जाऊन विजयाची प्रमाणपत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष हेमंत खंडेलवाल यांची भेट घेतली. “संघटनेप्रति समर्पण, अथक परिश्रम आणि सार्वजनिक सेवेचा मोठा अनुभव याचा राज्य आणि देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावाल याची मला खात्री आहे,” असे खंडेलवाल यांनी ‘एक्स’वर लिहिले आणि तिघांना शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसला धक्का
मीनाक्षी नटराजन यांनी फॉर्म २६ सादर करताना त्यांच्याविरोधातील तेलंगणमधील न्यायालयात दाखल तक्रारीचे प्रकरण उघड केले नाही या कारणावरून निवडणूक अधिकारी शर्मा यांनी मंगळवारी नटराजन यांचा अर्ज फेटाळला. याप्रकरणी केवट यांनी तक्रार दाखल केली होती. मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसकडे एक उमेदवाराच्या विजयासाठी पुरेसे संख्याबळ होते. त्यामुळे नटराजन यांचा अर्ज फेटाळला गेल्यामुळे पक्षाला धक्का बसला आहे. त्याविरोधात पक्षाने निवडणूक आयोगाकडे दाद मागितली, मात्र आयोगाकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला. त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मात्र, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना ही याचिका न्यायालयात टिकेल का असा प्रश्न न्या. प्रशांत कुमार मिश्रा आणि न्या. अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठाने गुरुवारी उपस्थित केला.
