उत्तर प्रदेशमध्ये रविवारी मौर्य समाजाचे प्रतिनिधी संमेलन पार पडले. खासदार संघमित्रा मौर्य यांच्या भाषणावेळी झालेल्या एका प्रकारानंतर याठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी मौर्य यांच्या समर्थकांनी नाराज होत घोषणाबाजी सुरू केली. विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील यावेळी मंचावर उपस्थित होते. तरीही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि बॅनरबाजी सुरूच ठेवली.

मौर्य समाजाच्या सामाजिक प्रतिनिधी संमेलनावेळी बदायूंमधील खासदार संघमित्रा या मंचावर बोलण्यासाठी उभ्या होत्या. यावेळी त्यांचे भाषण सुरू असताना त्यांना मध्येच थांबवण्यात आले. यानंतर मंचावर शांतता पसरली. संघमित्रा या प्रकारामुळे नाराज होऊन आपल्या खुर्चीवर येऊन बसल्या. मौर्य यांनी यावेळी लगेच काही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले. संघमित्रा यांच्यानंतर उत्तर प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव यांचे भाषण होते. मात्र, संघमित्रा यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू केली. विशेष म्हणजे संघमित्रा झालेल्या प्रकारावरुन नाराज नसल्याचेही मंचावरून सांगण्यात आले; मात्र तरीही घोषणाबाजी सुरूच राहीली.

कार्यक्रमामध्ये आलेल्या या व्यत्ययामुळे योगी आदित्यनाथ यांनी उठून संघमित्रा यांच्याकडे पाहिले. त्यानंतर संघमित्रा यांनी आल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्या म्हणाल्या, “मी उच्च नेतृत्वावर किंवा समाजावर नाराज नाही. माझ्या भाषणात व्यत्यय आणलेला मी सहन करत नाही, त्यामुळे मी शांत बसले. आपल्या समोर मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष असे उच्चपदस्थ व्यक्ती आहेत. त्यामुळे आपण नियम पाळून शांत रहायला हवं. आपला समाज आतापर्यंत नियमांमध्ये राहूनच आपल्या हक्कांसाठी लढला आहे. या गोष्टीचा दाखला तुम्ही द्यायला हवा.” असे म्हणत त्यांनी आपल्या समर्थकांना घोषणाबाजी आणि बॅनरबाजी बंद करण्याचे आवाहन केले.