Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. एवढंच नाही तर त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवर केलेल्या ड्रोन हल्ल्याला देखील चौख प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारतीय सैन्य दलाकडून देण्यात आली. आता भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळे तयार केली असल्याची माहिती सांगितली जात आहे.

ऑपरेशन सिंदूरबाबत सर्वपक्षीय खासदार विविध देशांत जाऊन भारताची भूमिका मांडणार आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचा संदेश जगापर्यंत पोहोचावा, या अनुषंगाने केंद्र सरकार येत्या काही दिवसांत जगभरातील विविध देशात सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळे पाठवण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

वृत्तानुसार, सरकारने अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांशी संपर्क साधला असून त्यांना विविध देशांत पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत कशा प्रकारे एकजूटीने उभा आहे? हा संदेश देण्यासाठी आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा मांडण्यासाठी केंद्र सरकार विदेशात विशेष दूत पाठवण्याचा विचार करत असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार या संदर्भात स्वतंत्र सर्वपक्षीय शिष्टमंडळे तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला युरोप आणि आखाती देशांना हे शिष्टमंडळे भेट देतील. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभा व राज्यसभा सचिवालय या संदर्भातील काम करत आहे. या माध्यमातून या शिष्टमंडळात सहभागी होणाऱ्या खासदारांची यादी तयार केली जाईल. भारतावर प्रथम दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून चोख प्रत्युत्तर दिलं हे देखील यामधून सांगितलं जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांचे फोन आले असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी त्यांना राष्ट्रीय हितासाठी शिष्टमंडळात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं आहे. सरकार ज्या खासदारांच्या संपर्कात आहे त्यामध्ये काँग्रेसचे शशी थरूर, सलमान खुर्शीद, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, एआयएमचे असदुद्दीन ओवैसी, द्रमुकच्या कनिमोळी आणि भाजपाचे बैजयंत पांडा यांचा समावेश असल्याचं वृ्त्तात म्हटलं आहे.