Indian Crew’s Distress Call After US Missile Attack Video: “सर, आम्ही ‘एमटी मारिव्हेक्स’ या ऑईल टँकरमधून बोलत आहोत… आमच्या जहाजाला भीषण आग लागलीये आणि जहाज समुद्रात बुडत आहे. प्लीज आम्हाला वाचवा…” ओमानच्या समुद्रात अमेरिकन नौदलाच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा थरार अनुभवणाऱ्या एका भारतीय खलाशाचा हा आर्त टाहो सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. या जहाजावर एकूण २४ भारतीय कर्मचारी तैनात होते.

इराणवरील अमेरिकन निर्बंधांचे उल्लंघन करून पुढे जाणाऱ्या ‘पालाऊ’चा ध्वज असलेल्या या व्यापारी जहाजावर सोमवारी अमेरिकेने क्षेपणास्त्र डागले. या भीषण हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रूमला आग लागली आणि जहाजाला भगदाड पडले. सुदैवाने, ओमानच्या लष्कराने वेळेवर मदतकार्य राबवत सर्व २४ भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले आहे.

“इंजिन रूमवर हल्ला झालाय, प्लीज लवकर या…”

समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये भारतीय खलाशाच्या आवाजातील भीती आणि संकटाची तीव्रता स्पष्टपणे जाणवत आहे. तो म्हणतो, “अमेरिकन नौदलाने आमच्या इंजिन रूमवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. जहाजाच्या तळाला मोठे भगदाड पडले असून आत पाणी भरत आहे. जहाजावर आग लागली आहे, कृपया मदत करा… आम्हाला तात्काळ मदतीची गरज आहे. जहाजावरील सर्व २४ कर्मचारी भारतीय आहेत. प्लीज, लवकरात लवकर मदत पाठवा.”

VIDEO: ओमान हवाई दलाचे हेलिकॉप्टर आणि थरारक रेस्क्यू ऑपरेशन

मुंबईतील ‘भारतीय तटरक्षक दलाच्या सागरी बचाव समन्वय केंद्राला’ (MRCC) सोमवारी दुपारी २:२० वाजण्याच्या सुमारास या हल्ल्याची माहिती मिळाली. टँकर ‘एमटी मारिव्हेक्स’ ओमानच्या मसिराह बेटाजवळ उभा होता. भारतीय तटरक्षक दलाने तातडीने ओमानच्या सागरी शोध आणि बचाव केंद्राशी (OMSC) संपर्क साधून समन्वय सुरू केला.

त्यानंतर दुपारी ३:२५ च्या सुमारास ओमान रॉयल एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरने मसिराह हवाई तळावरून उड्डाण केले आणि अवघ्या २० मिनिटांत ते घटनास्थळी पोहोचले. हेलिकॉप्टरने समुद्रात बुडणाऱ्या जहाजावरून सर्व भारतीय खलाशांना सुखरूप एअरलिफ्ट केले. या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचे व्हिडिओही आता समोर आले आहेत.

ओमानच्या लष्कराने वेळेवर मदतकार्य राबवत सर्व २४ भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले आहे.

संरक्षण मंत्रालयाचे अधिकृत पत्रक

“या यशस्वी बचाव मोहिमेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षा यंत्रणांमधील मजबूत समन्वय पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी आणि संकटकाळात त्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी भारतीय तटरक्षक दल सदैव कटिबद्ध आहे.”

अमेरिकेने भारतीय खलाशी असलेल्या जहाजावर हल्ला का केला?

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) या हल्ल्याची पुष्टी केली आहे. अमेरिकेने इराणच्या बंदरांभोवती घातलेली सागरी नाकेबंदी तोडून हे रिकामे जहाज इराणच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. अमेरिकन नौदलाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेने दिलेल्या निवेदनात काय म्हटले आहे?

“यूएसएस अब्राहम लिंकन (CVN 72) या युद्धनौकेवरून सुपर हॉर्नेट (F/A-18) फायटर जेटने या जहाजाच्या इंजिन आणि स्टिअरिंग रूमवर अचूक निशाणा साधला. वारंवार सूचना देऊनही जहाजाच्या कॅप्टनने आदेश मानले नाहीत. आता हे जहाज इराणला जाऊ शकणार नाही.” अहवालानुसार, ‘एमटी मारिव्हेक्स’ने अमेरिकेची नाकेबंदी तोडण्याचे तब्बल चार प्रयत्न केले होते. यापूर्वी तीन वेळा अमेरिकन नौदलाने इशारा दिल्यानंतर हे जहाज मागे फिरले होते, मात्र चौथ्यांदा त्यांनी नाकेबंदी भेदण्याचा प्रयत्न केला.

युद्धाची पार्श्वभूमी आणि सागरी नाकेबंदी

चालू वर्षात २८ फेब्रुवारी रोजी युद्ध भडकल्यानंतर इराणने खनिज तेल आणि वायू वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) हा सागरी मार्ग बंद केला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात पाकिस्तानात झालेली शांतता चर्चा निष्फळ ठरली. परिणामी, अमेरिकेने १३ एप्रिलपासून इराणच्या बंदरांना वेढा घालत कडक सागरी नाकेबंदी लागू केली आहे.

अमेरिकेने दिलेल्या माहितीनुसार, या नाकेबंदीदरम्यान आतापर्यंत नियम तोडणाऱ्या ७ जहाजांना निकामी करण्यात आले आहे, तर १३४ जहाजांना इशारा देऊन मागे फिरवण्यात आले आहे. केवळ मानवतावादी मदत घेऊन जाणाऱ्या ४२ जहाजांनाच या मार्गावरून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.