Muhammad Yunus : शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. या सरकारच्या प्रमुखपदी नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री बांगलादेशच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यासह आंदोलक विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी तसेच तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित असल्याचे सांगितलं जात आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपती भवनात झालेल्या बैठकीत मोहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव बांगलादेशमधील आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला होता. त्यांचा हा प्रस्ताव या बैठकीत मान्य करण्यात आला. त्यानुसार आता मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. हेही वाचा - Bangladesh Violence Update: “आम्ही भारताला यासाठी माफ करू शकत नाही”, नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांचा संताप; म्हणाले, “माझ्या भावाच्या घरात…”! मोहम्मद युनूस हे शेख हसीना यांचे कट्टर विरोधक मोहम्मद युनूस हे शेख हसीना यांचे कट्टर विरोधक मानले जातात. पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी शेख हसीना यांच्यावर जोरदार टीका केली होती. “आम्ही शेख हसीना यांच्या कारकिर्दीत त्यांच्या अंमलाखालचा देश होतो. त्या एखाद्या अंमलदाराप्रमाणे वागत होत्या. एखाद्या हुकुमशाहप्रमाणे सगळंकाही नियंत्रित करत होत्या. आज बांगलादेशचे सर्व नागरिक स्वतंत्र झाले आहेत”, असं युनूस म्हणाले होते. तसेच, हसीना यांनी त्यांचे वडील शेख मुजीबूर रेहमान यांचा थोर वारसा उद्ध्वस्त केला, अशी टीकाही त्यांनी केली होती. याशिवाय युनूस यांनी नुकताच इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीतही हसीना यांच्यावर हल्लाबोल केला होता. भारतावरही केली होती टीका या सर्व प्रकरणामध्ये मोहम्मद युनूस यांनी भारतावर आगपाखड केली होती. बांगलादेशमधील या सर्व घडामोडींबाबत भारत सरकारने हा त्या देशाचा अंतर्गत मुद्दा आहे, अशी भूमिका जाहीर केली, त्यावरून मोहम्मद युनूस यांनी संतप्त भूमिका मांडली होती “SAARC च्या स्वप्नावर माझा विश्वास होता. सर्व सदस्य राष्ट्रांशी युरोपियन युनियनप्रमाणे एखाद्या कुटुंबासारखे संबंध ठेवण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे जेव्हा भारतानं सांगितलं की हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे, तेव्हा मला प्रचंड वेदना झाल्या. जर माझ्या भावाच्या घरात आग लागली असेल, तर मी तो त्याचा अंतर्गत मुद्दा आहे असं कसं म्हणू शकतो? राजनैतिक भाषेत ‘अंतर्गत मुद्दा’ यापेक्षाही अनेक योग्य शब्द आहेत”, असं युनूस या मुलाखतीत म्हणाले होते.