भाजपाचे आमदार नितेश राणे यांचं नाव सिद्धुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख असणाऱ्या संतोष परब मारहाण प्रकरणामध्ये समोर आल्यापासून त्यांच्या अडचणी दिवसोंदिवस वाढतानाचं चित्र दिसत आहे. अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. नितेश राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळलाय. हा अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे ते आता थेट उच्च न्यायालयात गेले असून येथे त्यांची बाजू भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी मांडणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहतगी मांडणार बाजू…
नितेश राणेंनी अटकपूर्व जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून २७ जानेवारी रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. नितेश राणे यांच्यावतीने मुकूल रोहतगी युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे रोहतगी यांच्यासारख्या मोठ्या वकिलाचं नाव या प्रकरणामध्ये आल्याने आता नितेश राणेंनी केलेल्या याचिकेला अधिक महत्व प्राप्त झालं असून त्यांना सर्वोच्च न्यायलयात तरी दिलासा मिळतो का हे पहावं लागेल. रोहतगी हे नितेश राणेंची बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर रोहतगी नक्की कोण आहेत आणि त्यांचं एका सुनावणीचं मानधन किती आहे याबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

आर्यन खान प्रकरणामुळे चर्चेत…
नोव्हेंबर महिन्यामध्येच मुकुल रोहतगी हे नाव प्रसार माध्यमांमध्ये फार चर्चेत होतं. यामागील कारण होतं बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात झालेली अटक आणि त्यानंतर जवळजवळ महिन्याभराने मिळालेला जामीन. आपल्या मुलाला जामीन मिळावा आणि तो तुरुंगाबाहेर यावा यासाठी शाहरुखने रोहतगी आणि त्यांच्या लीगल टीमची मदत घेतली होती. आर्यनच्या जामीनाच्या प्रत्येक सुनावणीदरम्यान ही सर्व टीम न्यायालयात हजर होती.

नक्की वाचा >> संतोष परब मारहाण प्रकरण: कणकवली पोलीस स्थानकात अचानक आले नितेश राणे, त्यानंतर एक तास…

शाहरुखने ऑफिसमध्ये जाऊन घेतली भेट
रोहतगी यांच्या टीमने अंमली पदार्थ विरोधी पथक म्हणजेच एनसीबीने आर्यनच्या जामिनाला केलेला विरोध खोडून काढणारा युक्तिवाद केला होता. यात ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांचा युक्तिवाद प्रसारमाध्यमांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरलेला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आर्यन आणि अन्य दोन याचिकाकर्त्यांचा जामीन मंजूर केला होता. यानंतर मुकुल रोहतगी आणि त्यांच्या टीमने कशाप्रकारे आर्यनला सोडवलं यासंदर्भात प्रसारमाध्यमांकडून बरंच वृत्तांकन झालं होतं. शाहरुखने स्वत: आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर रोहतगी आणि त्यांच्या टीमचे आभार मानन्यासाठी त्यांच्या कार्यालयाला भेट दिली होती. या भेटीचे फोटोही चांगलेच व्हायरल झालेले.

या खटल्यांमध्येही केलाय युक्तीवाद
मुकुल रोहतगी यांनी २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुजरात सरकारची बाजू मांडली होती. तसेच, बनावट चकमक प्रकरणातही त्यांनी गुजरात सरकारच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद केला होता. मुकुल यांचे वडील अवध बिहारी रोहतगी हे उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. १८ जून २०१७ पर्यंत मुकुल रोहतगी हे देशाचे १४ वे अ‍ॅटर्नी जनरल होते.

लोकसत्ता विश्लेषण: नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार असणारं संतोष परब मारहाण प्रकरण नेमकं आहे तरी काय?

महाराष्ट्र सरकारने दिलेले १.२१ कोटी…
एका माहिती अधिकार कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या अर्जाला देण्यात आलेल्या उत्तरामध्ये महाराष्ट्र सरकारने रोहतगी यांना न्या. बी.एच. लोया प्रकरणामध्ये सरकारची बाजू मांडण्यासाठी जवळपास १.२१ कोटी रुपये मानधन दिल्याचा खुलासा केला होता.

एका सुनावणीसाठी किती मानधन घेतात?
हेच मुकुल रोहतगी आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकुल रोहतगी एका सुनावणीसाठी जवळपास १० लाख रुपये फी घेत असल्याचं सांगितलं जातं. रोहतगी हे अती विशेष आणि विशेष म्हणजेच व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी व्यक्तींची प्रकरणचं हाताळतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukul rohatgi one hearing fees know who is the lawyers who got the responsibility of saving nitesh rane in santosh parab attack case scsg
First published on: 25-01-2022 at 17:09 IST