समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांनी मंगळवारी बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगात असलेले गायत्री प्रजापती यांची भेट घेऊन त्यांचा बचाव केला आहे. प्रजापती यांना चुकीच्या आरोपाखाली तुरूंगात ठेवण्यात आल्याचे मुलायम यांनी म्हटले. या वेळी त्यांनी माध्यमांवरही आपला राग व्यक्त केला. प्रजापती हे एखादे दहशतवादी असल्यासारखे त्यांच्याबाबत वार्तांकन केले जात असल्याचे त्यांनी म्हटले.

भाजप सरकार बदल्याच्या भावनेने काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रजापतीसारख्या निर्दोष व्यक्तीला आज तुरूंगात डांबण्यात आले आहे. जी महिला प्रजापती यांच्या घरी गेली नाही. तर तिच्यावर बलात्कार कसा झाला, असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.

गायत्री यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे. दहशतवाद्यासारखी वागणूक मिळत आहे. अनेक पत्रकार त्यांच्याबद्दल चुकीचे लिहित आहेत. जेव्हा आम्ही तुरूंगात होतो, तेव्हा अनेक पत्रकार योग्यरितीने लिहायचे. आता पत्रकारांना काय झालंय काय माहीत, असा सवाल त्यांनी विचारला.

महिलेप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. आता तुमच्या लेखनीत ताकद आहे. तुम्हीच योग्य लिहा, असे आवाहन मुलायम यांनी पत्रकारांना केले.

दरम्यान, एक महिला आणि तिच्या मुलीवर बलात्कार केल्याचा ठपका गायत्री प्रजापतींवर ठेवण्यात आला आहे. गायत्री प्रजापती उत्तर प्रदेशच्या अखिलेश यादवांच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते काही काळ फरार झाले होते. उत्तर प्रदेश निवडणुकांचे निकाल लागल्यावर काही दिवसांनी ते परतले होते.

उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर १५ मार्च रोजी गायत्री प्रजापतींना अटक करण्यात आली होती. अटकेआधी अनेक दिवस त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला होता. सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात प्रजापती व इतर सहा जणांवर प्राथमिक माहिती अहवाल दाखल करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. प्रजापती व इतरांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या अल्पवयीन मुलीवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. समाजवादी पक्ष सत्तेमध्ये होता त्यामुळे त्यांना अटक करण्यात येत नव्हती अशी टीका विरोधकांनी केली होती. निवडणुका संपल्यानंतर त्यांना त्वरित अटक करण्यात आली होती.