Waterfall Accident Selfie Video Andhra Pradesh News: सेल्फीच्या नादात जीव गमावल्याच्या घटना अनेकदा समोर येत असतात. निसर्गाच्या सानिध्यात सहलीला गेल्यानंतर थोडी खबरदारी घेऊन आनंद घ्यायचा असतो. मात्र हल्ली फोटो आणि व्हिडीओसाठी तरुणाई अनावश्यक धाडस करून बसते आणि उत्साहात काहींना जीव गमावावा लागतो. आंध्र प्रदेशच्या अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात अशीच दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हुकुंपेटा मंडलातील जांबुवलसा गावातील चार मुली विशाखापट्टणमजवळील मुल्लुंगुम्मी धबधब्याच्या वनक्षेत्रात सहलीला गेल्या होत्या. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना म्हटले, चारही मुली धबधब्याखाली निसरड्या खडकावर सेल्फी घेत होत्या. हसत-खेळत मजा करत असताना त्यांचा पाय घसरला आणि त्या पाण्यात पडल्या. एकाही मुलीला पोहता येत नसल्यामुळे परिस्थिती परिस्थिती हाताबाहेर गेली आणि पाण्याच्या प्रवाहात त्या खेचल्या गेल्या.

मुलींच्या किंकाळ्या ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चारपैकी एका मुलीला वाचवण्यात यश आले असून तिला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले गेले. मात्र तीन मुली पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्रिशा (वय १७), रत्नकुमारी (वय १६) आणि पवित्रा (वय १६) या मुलींना जीव गमवावा लागला.

पोलिसांनी घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत तीन मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून नेमका घटनाक्रम काय होता, ते उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पोलिसांनी पुढे सांगितले की, येथील धबधबा लहान दिसत असला तरी तेथील खडक फारच गुळगुळीत आणि निसरडे आहेत. तसेच पाण्याचा प्रवाहही फसवा असून तो कधी मोठा होतो तर कधी संथ असतो. त्यामुळे अनेकदा पर्यटकांचा गोंधळ उडतो. पोलिसांनी पर्यटकांना आवाहन केले आहे की, त्यांनी याठिकाणी आल्यावर अधिक काळजी घ्यावी.

आंध्रप्रदेशच्या अल्लुरी जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी एसआरएम विद्यापीठात शिक्षण घेणारे पाच विद्यार्थी बुडून मृत्यू पावले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावर विद्यार्थी फिरण्यासाठी आले होते. किनाऱ्यावर फोटो घेत असताना पाय घसरल्यामुळे ते पाण्यात पडले. खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाच जणांचा बुडून मृत्यू झाला.