भारतातील सर्वाधिक महत्त्वाकांक्षी असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आता महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याची माहिती सांगितली जाते. मात्र, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्यास झालेल्या कथित विलंबाला जपानने भारताला जबाबदार धरलं आहे. यावरून जपानच्या एका माजी मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पातील विलंबासाठी भारतीय मंत्री आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या वाटाघाटीच्या दरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असा दावा हिदेकी माकिहारा यांनी केला आहे. एवढंच नाही तर एका जपानी वृत्तपत्रात दिलेल्या एका लेखात हा बुलेट ट्रेन प्रकल्प मूळ ‘शिंकान्सेन’ मॉडेलपासून भरकटला असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. हिदेकी माकिहारा यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.

हिदेकी माकिहारा यांनी काय म्हटलं?

बुलेट ट्रेन प्रकल्पाला झालेल्या विलंबाला पूर्णपणे भारत जबाबदार असल्याचा आरोप हिदेकी माकिहारा यांनी केला. याबाबत माकिहारा यांनी म्हटलं की, “काहीही झालं तरी ते (भारत) दिलेलं वचन पाळत नाहीत. एखादं वचन दिलं, तर ते लगेच त्यापासून माघार घेतात किंवा शब्द फिरवतात. या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बैठका आणि वाटाघाटींदरम्यान भारतीय मंत्र्यांच्या बाजूने आलेली बेजबाबदारपणाची वृत्ती वारंवार दिसून आलेली होती. त्यामुळे काही झालं तरी ते दिलेलं वचन पाळत नाहीत”, अशा शब्दांत हिदेकी माकिहारा यांनी संताप व्यक्त केला.

Japan Former Minister Hideki Makihara

“तसेच या प्रकल्पासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या सर्व जपानी लोकांप्रती आदर बाळगून मला हे सांगावं लागतंय की, हा प्रकल्प लवकर पूर्ण न होण्यास भारतीय बाजू पूर्णपणे जबाबदार आहे असं मला वाटतं. अगदी जपानच्या पंतप्रधानांच्या भेटीतून देखील काहीही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे भारत-शिंकान्सेन प्रकल्प अयशस्वी ठरला आहे”, असं हिदेकी माकिहारा यांनी म्हटलं आहे.