अकासा एअरलाइन्सच्या एका विमानाने काल (मंगळवारी) मुंबई विमानतळावरून अहमदाबादसाठी उड्डाण केले होते. तासाभरात विमानाचे लँडिंग अहमदाबाद विमानतळावर होणार होते. परंतु, अहमदाबाद विमानतळ परिसरात वाऱ्याचा वेग अधिक होता. त्यामुळे विमानाला लँडिंग करण्यास अडचणी येत होत्या. लँडिंग करण्यासाठी जवळपास १५ ते २० मिनिटे विमानाने अहमदाबाद विमानतळाभोवती घिरट्या घातल्या. दोनदा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. त्यानंतर ते विमान राजस्थानमधील जयपूरकडे वळवण्यात आले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबत वृत्त दिले आहे. नेमके काय घडले ते जाणून घेऊया.

अकासा एअरलाइन्सच्या एअर फ्लाइट QP 1781 या विमानाने काल (मंगळवारी) सकाळी ९ वाजता अहमदाबादसाठी उड्डाण केले होते. सकाळी ९ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालेले विमान सकाळी १० वाजता अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार होते. अहमदाबादजवळ विमान पोहोचल्यानंतर विमानतळ परिसरात वाऱ्याचा वेग अधिक होता. त्यामुळे विमान लँडिंग करण्यास अडचण येत होती. वैमानिकाने लँडिंग करण्याचा दोनदा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. लँडिंगसाठी विमानाने अहमदाबाद विमानतळाभोवती जवळपास १५-२० मिनिटे घिरट्या घातल्या. त्यानंतर विमान राजस्थानातील जयपूरकडे वळवण्यात आले.

जयपूरमधील विमानतळावर विमानाचे लँडिंग झाले. त्यानंतर विमानात इंधन भरण्यात आले. विमानाने पुन्हा अहमदाबादला जाण्यासाठी उड्डाण घेतले. दुपारी १.३० वाजता विमानाचे अहमदाबाद विमानतळावर लँडिंग झाले. अशाप्रकारे मुंबईहून निघालेले विमान व्हाया जयपूर अहमदाबादला पोहोचले. मुंबई विमानतळावरून सकाळी ९ वाजता उड्डाण केलेले विमान सकाळी १० वाजता (एका तासात) अहमदाबादला लँड होणार होते. परंतु, ते विमान दुपारी १.३० वाजता अहमदाबाद विमानतळावर सुखरूप लँड झाले.

दरम्यान, अकासा एअरलाइन्सचे विमान अहमदाबाद विमानतळावर लँडिंग होण्यास अडथळे येत होते, त्याचवेळी आठ प्रवासी क्षमता असलेले बोईंग 737 हे विमान लँडिंग करण्यासाठी आले होते. परंतु, वाऱ्याचा वेग अधिक असल्याने या विमानाचेही लँडिंग अहमदाबाद विमानतळावर झाले नाही. त्यामुळे हे विमानही जयपूरकडे वळवण्यात आले. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच इतर विमान देखील अहमदाबाद विमानतळावर पोहोचणार होते. त्यामुळे ऐनवेळी काही गडबड होऊ नये म्हणून दोन्ही विमाने जयपूरला वळवण्यात आली.