मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याची सुनावणी येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश कौसर झैदी यांनी २० जुलैपर्यंत पुढे ढकलली. या खटल्यातील चार साक्षीदार शनिवारी न्यायालयात पोहोचू न शकल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतला. याप्रकरणी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या झकिउर रेहमान लखवी याच्यासह अन्य सहा पाकिस्तानी नागरिकांवर खटला दाखल करण्यात आला असून २००९पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे.
या हल्ल्याचा कट आखणाऱ्या तसेच तो तडीस नेणाऱ्यांपैकी अमजद खान आणि अतिकूर रेहमान यांना या साक्षीदारांनी ओळखले असून यातील काहींनी त्या सुमारास ११ मोठय़ा ‘बोटी’ विकत घेतल्या होत्या. या साक्षीदारांची पुढील साक्ष शनिवारी अपेक्षित होती, मात्र ही सुनावणी इस्लामाबाद येथे हलविण्यात आल्याने कराचीपासून इस्लामाबादपर्यंतचा प्रवास खर्च आपणास परवडणार नाही, असे या साक्षीदारांनी न्यायालयास लेखी कळविल्याने न्यायालयाने ही सुनावणी २० जुलैपर्यंत पुढे ढकलली.