Mumbai Bar Association NALSAR Controversy: बीसीआयच्या अध्यक्षांनी उशिरा माफी मागितली असल्याचे म्हणत मुंबई बार असोसिएशनने बुधवारी मनन मिश्रा यांच्या नालसार संबधित कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला. “मिश्रांनी मागितलेली माफी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे, त्यात पश्चात्तापाची प्रामाणिक भावना नाही. मिश्रा यांनी बीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा होता”, असेही असोसिएशनने १८ ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सीजेपीच्या दास यांनी केली राजीनाम्याची मागणी
हैदराबाद येथील नालसार विधी विद्यापीठाच्या २०२६ च्या उत्तीर्ण होणाऱ्या संपूर्ण बॅचची नोंदणी स्थगित करण्याचे आदेश बार कौन्सिल ऑफ इंडियाने दिले होते. त्यानंतर झालेल्या तीव्र विरोधानंतर बीसीआयने हा निर्णय मागे घेतला. यानंतर आता मुंबई बार असोसिएशनचे पत्र समोर आले आहे. बार असोसिएशनचे हे पत्र ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी एक्सवर शेअर केले आहे. मनन मिश्रा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आजच राजीनामा द्यावा, अशी मागणीही दास यांनी केली आहे.
सौरव दास काय म्हणाले?
“बीसीआय अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. आता देशातील प्रतिष्ठित बार संस्थांपैकी एक असलेल्या मुंबई बार असोसिएशननेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांची उशिरा मागितलेल्या माफीपुरता मर्यादित नाही, तर त्यांचा अरेरावी, हुकूमशाही आदेशांचा आणि संशयास्पद वर्तनाचा इतिहास आहे,” असे दास यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुंबई बार असोसिएशनने पत्रात काय म्हटलंय?
मिश्रा यांची एकतर्फी कारवाई आणि त्यानंतर बदलेला आदेश, यात नोंदणी स्थगितीचा निर्णय मागे घेण्यात आला परंतु नालसार प्रशासनाला चौकशी करण्याचे निर्देश कायम ठेवले आहेत, याची बार असोसिएशनने दखल घेतली आहे. मनन मिश्रा यांनी बीसीआय अध्यक्षपदावर असताना नालसारच्या विद्यार्थ्यांविरोधात असे आदेश देणे वेदनादायी बाब आहे, असे असोसिएशनने पत्रात म्हटले आहे. मिश्रा यांच्या कृतीचा तीव्र निषेध करण्यात येत आहे, असे मुंबई बार असोसिएशनने म्हटले आहे. मिश्रा यांची माफी उशिराने आलेली आहे. ही माफी केवळ परिस्थिती निवळण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. गैरवर्तनानंतरही मिश्रा अध्यक्षपदावर कायम असल्याने ही माफी पश्चात्तापाची खरी भावना मानली जाऊ शकत नाही, असेही या पत्रात म्हटले आहे.
