मुंबईतील अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेकरींवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. माहिममधील तब्बल सहा दशकांपासून कार्यरत असलेल्या प्रसिद्ध बिम्बो ब्रिस्टॉल बेकरीसह पाच बेकरींचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. हा ब्रँड आपल्या ब्रेडच्या पावासाठी लोकप्रिय आहे. तपासणीदरम्यान अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याचे एफडीएने सांगितले. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
३४ बेकरींची तपासणी
एफडीएने गुरुवारी मुंबईतील ३४ बेकरींची तपासणी केली. या मोहिमेत २२ बेकरींना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, पाच बेकरींचे परवाने रद्द करण्यात आले, तर चार बेकरींना ‘स्टॉप बिझनेस’ नोटीस देण्यात आली. ‘अरानी फूड्स’च्या संकेतस्थळानुसार, ही बेकरी प्रामुख्याने विविध खासगी कंपन्या, सरकारी संस्था, हॉटेल्स, रुग्णालये आणि रेल्वेसाठी स्लाईस्ड सँडविच ब्रेडचे उत्पादन करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे दररोज ७०,००० हून अधिक ब्रेडचे पाव उत्पादन करण्याची क्षमता आहे आणि ते डहाणू ते चर्चगेट व लोणावळा ते सीएसटी पर्यंतच्या ग्राहकांना पुरवठा करतात. या बेकरीचे मालक आस्पी इराणी आहेत, ज्यांच्या मालकीचे ‘जिमी बॉय’ हे देखील आहे.
माहिममधील ब्रिस्टल बेकरीच्या तपासणीदरम्यान एफडीएने शेअर केलेल्या व्हिडिओ आणि जिओ-टॅग केलेले फोटो असे दिसून येते की, तेथील उत्पादनाचा परिसर अस्वच्छ असून त्यावर अन्नाचे अवशेष पडलेले आहेत, बेकिंग रॅक आणि उपकरणांवर भाजलेल्या अन्नाचे थर साचलेले आहेत, तसेच अत्यंत डाग पडलेल्या साच्यांमध्ये ब्रेड भाजला जात आहे.
झुरळे, माशा आणि कीटकांचा वावर
तपासणीत असे दिसून आले की बेकरीच्या उत्पादन विभागात झुरळे, माश्या आणि इतर कीटकांचा वावर, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीची नोंद पूर्ण नव्हती. विशेष म्हणजे, बेकरीमध्ये अन्नपदार्थ तयार करण्याचे काम सुरू असतानाच तिथे सिव्हल पेंटिंगचे कामही चालू होते, जे अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारे आहे.
एफडीएने खालील पाच बेकरींचे परवाने रद्द केले आहेत.
- बिम्बो ब्रिस्टॉल बेकरी, माहिम
- अनमोल बेकरी अँड स्टोअर्स, अंधेरी (पूर्व)
- न्यू महाराष्ट्र बेकरी अँड स्टोअर्स, चेंबूर
- साबा बेकरी अँड स्टोअर्स, गोरेगाव (पूर्व)
- उन्नती बेकरी, दहिसर (पश्चिम)
चार बेकरींना ‘स्टॉप बिझनेस’ नोटीस
बंगळुरू अय्यंगार बेकरी (काळाचौकी), गोल्डन बेकरी (घाटकोपर), मिर्झा अँड सन्स बेकरी (विक्रोळी) आणि बिग बाईट बेकरी (कांदिवली) यांना व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तपासणीदरम्यान काही संस्था नोंदणी किंवा परवान्याशिवाय सुरू असल्याचे आढळून आले, तर इतर ठिकाणी स्वच्छता, अन्न हाताळणी, परवान्यातील अटी आणि अन्नसुरक्षेच्या इतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. नियमांनुसार संबंधित संस्थांवर आवश्यक ती कारवाई करण्यात आली आहे, असे एफडीएने शुक्रवारी सायंकाळी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
एफडीएचे आवाहन
एफडीएने सर्व बेकरी व्यावसायिकांना ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६’ आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही केले.
