पीटीआय, अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गांधीनगर ते मुंबईदरम्यानच्या अद्ययावत अर्धद्रुतगती (सेमी-हाय स्पीड) ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी, आज, शनिवारपासून सुरू होत आहे. शहरे भारताचे भविष्य घडवतील आणि येत्या २५ वर्षांत देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची असेल, असे या वेळी मोदी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> खरगे विरुद्ध थरूर लढत; काँग्रेस अध्यक्षपदासाठी दोघांचेही उमेदवारी अर्ज दाखल

पंतप्रधान मोदी यांनी या वेळी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या डब्यांची पाहणी केली आणि त्यातील सोयीसुविधा जाणून घेतल्या. त्यांनी या रेल्वेच्या इंजिनाच्या नियंत्रण कक्षाचीही पाहणी केली. तसेच त्यांनी या गाडीतून काही वेळ प्रवासही केला. प्रवासात त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, महिला उद्योजक, संशोधक आणि तरुणांसह अन्य सहप्रवाशांशी संवाद साधला. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ साकारण्यासाठी परिश्रम घेणारे कामगार, अभियंते आणि इतर कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. या प्रवासात मोदी यांच्याबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहारमंत्री हरदीपसिंग पुरी होते, असे पंतप्रधान कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा >>> काबूलमध्ये शिक्षण संकुलात आत्मघातकी स्फोट, १९ विद्यार्थी ठार; शियाबहुल भागात हल्ला, २७ जण जखमी

दरम्यान, गुजरातमध्ये या वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे. त्या दृष्टीने मोदी यांचा हा दौरा बदलत्या राजकीय वातावरणात महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्र आणि गुजरातच्या राजधान्यांना जोडणारी ही रेल्वेगाडी ‘वंदे भारत’ मालिकेतील तिसरी रेल्वेगाडी आहे. या मालिकेतील पहिली रेल्वेगाडी नवी दिल्ली ते वाराणसीदरम्यान, तर दुसरी नवी दिल्ली ते वैष्णवदेवीदरम्यान (कटरा) सुरू करण्यात आली.

हेही वाचा >>> युक्रेनचे चार प्रदेश रशियात विलीन, पुतिन यांची करारावर स्वाक्षरी

‘मुंबई-गांधीनगर वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस’ आज, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. रविवार वगळता आठवडय़ातून सहा दिवस ती धावेल. मुंबई सेंट्रल स्थानकावरून सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी ती सुटेल आणि दुपारी १२.३० वाजता गांधीनगरला पोहोचेल. गांधीनगर येथून दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी मुंबईकडे रवाना होईल आणि रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचेल. सुरत, बडोदा आणि अहमदाबाद हे तीन थांबे आहेत.

हेही वाचा >>> जनसामान्यांशी संवादासाठी यात्रा हाच एकमेव पर्याय- राहुल 

वेगवान संपर्क

वंदे भारत एक्स्प्रेस ‘गेम चेंजर’ सिद्ध होईल. भारतातील दोन प्रमुख व्यावसायिक शहरांतील संपर्क वेगवान होईल. या रेल्वेगाडीमुळे प्रवाशांना अधिक सुगम आणि जणू काही विमान प्रवासाच्या वेगाचा अनुभव मिळेल. या गाडीत सुरक्षिततेच्या आधुनिक उपाययोजना आहेत. स्वदेशी बनावटीची ही रेल्वेगाडी टक्कररोधक प्रणालीसह अत्याधुनिक संरक्षक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

वैशिष्टय़े कोणती?

  • गाडीत विमानतळांप्रमाणे ‘व्हॅक्युम’ स्वच्छतागृहे
  • पहिल्या दर्जात आरामशीर, गोल फिरू शकणाऱ्या खुर्च्या
  • प्रवाशांशी संवाद साधण्याची व्यवस्था
  • सर्व डबे एकमेकांशी जोडणारी प्रणाली
  • सुरक्षेच्या दृष्टीने व्यापक आणि अत्याधुनिक उपाययोजना
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai gandhinagar vande bharat express from today cities india future pm narendra modi ysh
First published on: 01-10-2022 at 01:17 IST