Mumbai Man Arrested US Stalking latest news update : एका अल्पवयीन मुलीने संपर्क तोडल्यानंतर भारतातून थेट अमेरिकेला प्रवास करणाऱ्या मुंबईतील एका व्यक्तीला टेनेसीमधील डेव्हिडसन काउंटीत अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
उबर चालकाने पोलिसांना दिली माहिती
२४ सप्टेंबर रोजी ‘मेडलँड्स कम्युनिटी’ परिसरात एक प्रौढ व्यक्ती अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ३१ वर्षीय प्रीत पंकज जैन याला ताब्यात घेण्यात आलं. एका उबर ड्रायव्हरने पोलिसांना या संशयित पाठलागाबाबत सावध केलं आणि तिथूनच या प्रकरणाचा तपास सुरू झाला.
मुलीने ब्लॉक केलं अन्…
चौकशीदरम्यान जैनने पोलिसांना सांगितलं की, तो ऑनलाइन डेटिंगद्वारे ओळख झालेल्या एका मुलीला भेटायला आला होता आणि तिला भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तपासकर्त्यांनी शोधून काढलं की ती मुलगी अल्पवयीन होती. यानंतर डेव्हिडसन काउंटी शेरीफ ऑफिसच्या गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाचा भाग म्हणून जैनच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपासणी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक तपासणीतून असं समोर आलं आहे की, जैनने दीर्घकाळ त्या मुलीसोबत ऑनलाइन संबंध ठेवताना आपले खरे वय आणि ओळख लपवून ठेवली होती. जेव्हा त्या मुलीला जैनची खरी ओळख समजली, तेव्हा तिने संवाद थांबवला आणि त्याला ऑनलाइन ब्लॉक केले; त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. पोलिसांनी असा आरोप केला आहे की, जैनने त्या मुलीशी पुन्हा संपर्क साधण्याच्या उद्देशाने मुंबईहून थेट अमेरिकेत प्रवास केला.
या आरोपांच्या आधारे त्याच्यावर अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २५ सप्टेंबर रोजी जैनला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि त्यानंतर डेव्हिडसन काउंटी जिल्हा न्यायालयात सादर केलं गेलं. न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला असून, त्याला ‘डेव्हिडसन काउंटी डिटेंशन सेंटर’मध्ये (कोठडीत) ठेवण्यात आलं आहे. त्याची पुढील न्यायालयीन सुनावणी ६ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे.
