“मी माझा संसार बघू की माझ्यातली भीती? मी यापैकी माझा संसार निवडलाय”, पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबादचे रहिवासी असलेले मेहबूब शेख उद्विग्नपणे हे सांगतात तेव्हा गेल्या वर्षभरात त्यांच्यावर काय प्रसंग ओढवले असतील, याची कल्पनाही करवत नाही. ३७ वर्षांच्या मेहबूब शेख यांना बांगलादेशी असल्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षी मुंबईतून ताब्यात घेतलं होतं. तिथून पश्चिम बंगाल आणि पुढे बांगलादेश सीमापार पाठवण्यात आलं. पण काहीच दिवसांत ते भारतीयच असल्याचं सिद्ध झालं आणि त्यांना पुन्हा मुंबईत आणून सोडलं गेलं. ते सांगतात “मला भीती वाटते की मला पुन्हा उचलून नेतील. पण मला माझी पत्नी आणि मुलांसाठी कमवायचंय, मुलांची शाळेची फी भरायची आहे”. मेहबूब शेख हे एकटे नाहीत!
गेल्या वर्षभरात भारतभरातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर स्थलांतरीतांवर कारवाया करण्यात आल्या. त्यात मुंबईतून ताब्यात घेण्यात आलेल्या ७ व्यक्ती या भारतीयच असल्याचं सिद्ध झालं आणि त्यांना बांगलादेशातून पुन्हा मायदेशात पाठवण्यात आलं. पण ताब्यात घेण्याआधी बसलेली संसाराची घडी पूर्णपणे विस्कटलेल्या अवस्थेत ते परतले. सोबत माथ्यावर ‘संशयित बांगलादेश’ असल्याचा ठपकाही बसला. आता रोजच्या आयुष्यात करावा लागणारा संघर्ष त्या प्रत्येकाच्या उद्विग्नतेतून प्रकर्षाने समोर येतो. इंडियन एक्स्प्रेसनं या प्रत्येकाशी संवाद साधून त्यांची कथा आणि व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
SIR मध्येदेखील भारतीयत्व सिद्ध झालं!
मेहबूब शेख यांच्याप्रमाणेच ३० वर्षीय मिनारूल शेख हेदेखील मुर्शिदाबादचेच. गेल्या वर्षी जूनमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या ७ व्यक्तींमध्ये मिनारूल यांचाही समावेश होता. आधी त्यांना बांगलादेशात पाठवण्यात आलं. नंतर हे सातही जण भारतीय असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर दोन्हीकडच्या उच्चपदस्थांमध्ये चर्चा झाली व त्यांना पुन्हा मायदेशी म्हणजेच भारतात पाठवण्यात आलं. राज्यात SIR सुरू होण्याच्याही आधी हे सगळं झालं. कालांतराने एसआयआरमध्येही हे भारतीय असल्याचंच सिद्ध झालं.
मिनारूल आधी मुंबईत केस गोळाकरून ते व्यावसायिकांना विकण्याचं काम करत होते. पण बांगलादेशातून परतल्यानंतर ते काश्मीरला स्थायिक झाले आहेत. त्यांचा नेमका पत्ताही द्यायला ते घाबरत होते. ते म्हणाले, “आम्हाला मुंबईत परत आणल्यानंतर भारत सरकारकडून आम्हाला कोणतीही मदत करण्यात आली नाही. उलट ज्या लोकांकडे माझी उधारी होती, त्यांनी परिस्थितीचा गैरफायदा घेत मला पैसे परत करायला नकार दिला. मला माझ्या कुटुंबाची १ बिघा जमीन कर्ज फेडण्यासाठी विकावी लागली. आता मी आयुष्याची पुन्हा नवी सुरुवात करण्यासाठी काश्मीरमध्ये आहे”.
एसआयआरची अजब तऱ्हा…
दरम्यान, मिनारूल यांचं SIR सर्वेक्षण यशस्वी झालं असलं, तरी त्यांच्या पाच भावांना मात्र मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्यासाठी बरेच खेटे मारावे लागले. मेहबूब आणि मिनारूल यांच्याव्यतिरिक्त बांगलादेशातून अशाच प्रकारे माघारी आणण्यात आलेल्यांमध्ये मुर्शिदाबादचे नझीमुद्दीन शेख व शमिम खान, मोंतेश्वरचे मुस्तफा कमाल शेख, पर्बा बर्धमान व नॉर्थ २४ परगण्याचे फझर शेख व त्यांची पत्नी तस्लिमा शेख यांचा समावेश होता.
तृणमूल काँग्रेसकडून मदत?
पश्चिम बंगालमधील आधीच्या तृणमूल काँग्रेस सरकारने या सर्वांना आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण मेहबूब शेख म्हणतात, “मी परत आल्यानंतर स्थानिक तृणमूल नेत्याने माझी भेट घेतली. मला नोकरीचं आश्वासनही दिलं. पण ते आश्वासन पूर्ण झालं नाही. मी पश्चिम बंगालमध्ये रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिथे रोजंदारीसाठी फक्त ६५० रुपये मजुरी असून तीही रोज मिळण्याची शाश्वती नव्हती”. पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार आल्यानंतर मेहबूब शेख यांनी रोजगारासाठी पुन्हा मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला.
कागदपत्रं पुन्हा कशी जमा करायची?
आता या सर्वांसमोर ओळखीचा दाखला ठरणारी कागदपत्रं पुन्हा कशी जमा करायची? हा प्रश्न आहे. ५३ वर्षीय मुस्तफा सांगतात, “पश्चिम बंगालमध्ये काही दिवस राहण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या महिन्याच्या सुरुवातीला रोजगारासाठी मुंबई गाठली. मला ताब्यात घेण्याआधी मी मुंबईत १० वर्ष झारमुरी विकत होतो. बांगलादेशातून परतल्यानंतर मी नवीन मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आणि ई-श्रम कार्ड यासाठी अर्ज केले. कारण माझे आधीचे सगळे पुरावे पोलिसांनी काढून घेतले होते. माझ्या घराजवळही मी झारमुरी विकायचा प्रयत्न केला. पण मुंबईत माझा रोजचा नफा १२०० रुपये व्हायचा, पण बंगालमध्ये फक्त २५० ते ३०० रुपये”.
चुकीच्या कारवाईमुळे अचानक सारंकाही सुटून बांगलादेशात पाठवल्या गेलेल्या अशा अनेकांची भारतात परतल्यानंतर अशीच अवस्था झाली आहे. यातल्या प्रत्येकाला आयुष्याचा संघर्ष पुन्हा पहिल्यापासून सुरू करावा लागत आहे.
