खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी राहुल गांधींनी एका प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला फटकारलं. तुम्ही थेट भाजपासाठी का काम करता? भाजपासाठीच काम करायचं असेल तर छातीवर भाजपाचा बिल्ला लावा. स्वत:ला पत्रकार असल्याचं भासवू नका, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.
याप्रकरणी आता मुंबई प्रेस क्लबने आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराचा सार्वजनिक अपमान केल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी मुंबई प्रेस क्लबने केली आहे.
हेही वाचा- VIDEO : “क्यू हवा निकल गई क्या?”, भर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी टोचले पत्रकाराचे कान
क्लबने दिलेल्या निवेदनानुसार, एका पत्रकाराने राहुल गांधी यांना अपात्रतेबद्दल विचारलं असता, राहुल गांधींचं स्वत:वरचं नियंत्रण हरवलं आणि त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला फटकारलं. “तुम्ही थेट भाजपासाठी का काम करत आहात? भाजपासाठी काम करायचं असेल तर छातीवर भाजपाचा बिल्ला लावा. पत्रकार असल्याचं भासवू नका… क्यूं हवा निकल गई?” अशी टिप्पणी राहुल गांधींनी केली. यावर आता मुंबई प्रेस क्लबने आक्षेप घेतला आहे.
“पत्रकाराचं काम प्रश्न विचारणं आहे. संबंधित प्रश्नांना सन्मानाने आणि सभ्यतेने उत्तरे देणे, हे राजकीय नेत्यांचे कर्तव्य आहे. पण ही दुर्दैवाची बाब आहे की, देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे नेते राहुल गांधी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या प्रतिष्ठेचा आदर करण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे राहुल गांधींनी आपली चूकभूल मान्य करून संबंधित पत्रकाराची माफी मागावी,” असं निवेदनात म्हटलं आहे.