मुंबईहून बंगळुरूत शिफ्ट झालेल्या एका महिलेने दोन्ही शहरांमधील जीवनशैलीतील फरक सोशल मीडियावर सांगितला आहे. बंगळुरूच्या व्हाईटफील्ड परिसरातील आपल्या सोसायटीचा व्हिडीओ शेअर करताना तिने तेथील सुविधा पाहून आपण आश्चर्यचकित झाल्याचे म्हटले आहे. पतीसोबत बंगळुरूत राहणाऱ्या या महिलेने इंस्टाग्रामवर सोसायटीचा व्हिडीओ शेअर केला. “मुंबईहून आल्यामुळे बंगळुरूची ही बाजू पाहून आम्हाला धक्काच बसला. एका सोसायटीत एवढं सगळं कसं असू शकतं?” असा प्रश्न तिने उपस्थित केला. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
तीन स्विमिंग पूल, जिम आणि चार सुपरमार्केट
व्हिडीओमध्ये तिने आपल्या सोसायटीमधील विविध सुविधांची माहिती दिली. तिच्या म्हणण्यानुसार, सोसायटीमध्ये तीन स्विमिंग पूल, ट्रेनर्ससह सुसज्ज जिम, चार सुपरमार्केट आहेत. याशिवाय बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि स्क्वॅशसाठी सुविधा, विविध कम्युनिटी ॲक्टिव्हिटीज आणि अगदी मॉलचीही सुविधा असल्याचं तिने सांगितलं. “लिव्हिंग रूमपासून सिनेमागृहापर्यंत पोहोचायला फक्त पाच मिनिटं लागतात,” असंही तिने व्हिडीओमध्ये नमूद केलं.
‘मुंबईत एवढी मोकळी जागा मिळत नाही’
मुंबई आणि बंगळुरूच्या घरांच्या रचनेतील फरकही या व्हिडीओच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. मुंबईत जागेची कमतरता असल्याने तुलनेने लहान अपार्टमेंट्स आणि मर्यादित सोसायटी सुविधा अधिक सामान्य आहेत. याउलट बंगळुरूमध्ये मोठ्या भूखंडांवर उभारलेल्या गेटेड सोसायट्यांमध्ये घरांसोबतच स्विमिंग पूल, क्रीडा सुविधा, दुकानं आणि इतर अनेक सुविधा एकाच परिसरात उपलब्ध असतात.
महिलेने याआधीच्या एका व्हिडीओमध्येही बंगळुरूत स्थलांतर केल्यानंतर मोकळ्या जागेचा अनुभव आपल्यासाठी वेगळा असल्याचं सांगितलं होतं. “एका सोसायटीमध्ये एवढी मोकळी जागा असणं किती छान आहे, हे जाणवल्यानंतर मला बंगळुरू आवडायला लागलं,” असं तिने म्हटलं होतं.
‘मुलांना मोकळेपणाने खेळता येतं’
या नव्या व्हिडीओमध्ये तिने विशेषतः मुलांसाठी उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेचा उल्लेख केला. तिच्या म्हणण्यानुसार, बंगळुरूमध्ये मुलांना सोसायटीच्या परिसरात मोकळेपणाने धावता आणि खेळता येतं. “मी दररोज बंगळुरूच्या थोडं अधिक प्रेमात पडत आहे,” अशी भावना तिने व्यक्त केली.
‘बंगळुरूत अशा सोसायट्या सामान्य’
महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने “बंगळुरूमध्ये अशा प्रकारच्या सोसायट्या खूप सामान्य आहेत,” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या युजरने ही सोसायटी प्रेस्टिज शांतिनिकेतन असल्याचं सांगत, आपण येथे सात वर्षे राहिल्याचं नमूद केलं. या सोसायटीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जात असल्याचंही त्याने सांगितलं. या व्हिडीओमुळे मुंबईतील मर्यादित जागा आणि बंगळुरूतील मोठ्या गेटेड सोसायट्यांमधील सुविधांची तुलना सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहे.
