दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकतीच नऊ दहशतवाद्यांना अटक करून देशातील एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. हे दहशतवादी दिल्ली, मुंबईसह देशातील इतर महत्त्वाच्या शहरांवर हल्ले करण्याच्या तयारीत होते. या कारवाईनंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा अत्यंत विश्वासू आणि ‘राईट हँड’ मानला जाणारा गँगस्टर मुन्ना झिंगाडा याचे नाव पुन्हा एकदा समोर आले आहे.

पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’ ISI च्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या या दहशतवादी मॉड्यूलचा मुन्ना झिंगाडा हा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाले आहे. याबाबतचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

महत्त्वाची ठिकाणे होती टार्गेटवर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना भारतातील अणू ऊर्जा प्रकल्प, विमानतळ, रेल्वे स्थानके आणि वीज निर्मिती केंद्र यांसारख्या अतिसंवेदनशील सुरक्षा यंत्रणांवर आणि ठिकाणांवर हल्ले करण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांना या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर दारूगोळा आणि अत्याधुनिक शस्त्रे हस्तगत करण्यात यश आले आहे. या संपूर्ण मॉड्यूलचे नियंत्रण पाकिस्तानातून मुन्ना झिंगाडा, दिलावर खान, शहजाद भट्टी आणि आमीर जट्ट हे चार हँडलर्स करत होते.

कोण आहे मुन्ना झिंगाडा?

मुन्ना झिंगाडाचे खरे नाव ‘सईद मुदस्सर हुसेन’ असे आहे. तो मूळचा मुंबईतील जोगेश्वरी भागातील रहिवासी आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याचा जवळचा सहकारी छोटा शकील यांच्यासाठी झिंगाडाने अनेक वर्षे शार्प शूटर म्हणून काम केले आहे. दाऊदचा त्याच्या नेमबाजीवर इतका विश्वास होता की, त्याने आपल्या शत्रूंचा काटा काढण्यासाठी नेहमीच झिंगाडाचा वापर केला. मुंबईतील कुख्यात गँगस्टर अरुण गवळीवर हल्ला करण्याची जबाबदारीही दाऊदने झिंगाडावरच सोपवली होती.

बँकॉकमधील तो प्रसिद्ध हल्ला

१९९७ मध्ये दाऊदच्या सांगण्यावरून मुन्ना झिंगाडा नेपाळमार्गे पाकिस्तानात पळून गेला आणि कराचीत स्थायिक झाला. त्यानंतर २००० मध्ये दाऊदने त्याला ‘मोहम्मद सलीम’ या बनावट पाकिस्तानी पासपोर्टवर छोटा राजनचा गेम करण्यासाठी बँकॉकला पाठवले. या जीवघेण्या हल्ल्यातून छोटा राजन थोडक्यात वाचला, पण त्याचा जवळचा सहकारी रोहित वर्मा मारला गेला. या गोळीबारानंतर थायलंड पोलिसांनी झिंगाडाला अटक केली आणि तेथील न्यायालयाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

भारत विरुद्ध पाकिस्तान कायदेशीर लढाई

मुन्ना झिंगाडावर मुंबईत खून, खंडणी, गँगवॉर यांसारखे ७० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला भारताच्या स्वाधीन करण्यात यावे, अशी मागणी भारतीय यंत्रणांनी लावून धरली होती. झिंगाडा हा भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी भारताने त्याच्या कुटुंबाचे कागदपत्रे आणि डीएनए पुरावे थायलंडच्या न्यायालयात सादर केले होते.

दुसरीकडे, पाकिस्तानने तो त्यांचा नागरिक असल्याचा खोटा दावा केला. बँकॉकच्या कनिष्ठ न्यायालयाने सुरुवातीला भारताच्या बाजूने निकाल दिला होता, परंतु पाकिस्तानने याविरोधात अपील केले. अखेर २०१९ मध्ये बँकॉकच्या अपील न्यायालयाने तांत्रिक कारणांमुळे झिंगाडाला पाकिस्तानी नागरिक मानले. तुरुंगातून सुटल्यानंतर आयएसआय आणि डी-कंपनीच्या मदतीने तो पुन्हा पाकिस्तानात पळून गेला.

सध्या कराचीमध्ये बसून मुन्ना झिंगाडा भारतातील शांतता भंग करण्यासाठी आणि तरुणांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्यासाठी नवीन मॉड्यूल तयार करत आहे, ज्याचा पर्दाफाश आता दिल्ली पोलिसांनी केला आहे.