Moradabad Engineer Murder Case: Brother killed twin sister with 84 knife stabs : एक इंजिनियर तरूण हा त्याच्या आईच्या ऑफिसमध्ये भेटायला गेला आणि तीला “घरी चल, तुझ्यासाठी एक सरप्राइज आहे,” असे सांगत घऱी घेऊन आला. पण घरी आल्यावर आईला जे दृश्य पाहायला मिळालं त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये ही हृदयद्रावक घटना समोर आली असून, जिथे एका इंजिनिअर मुलाने आपल्याच जुळ्या बहिणीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर त्याने स्वतःच्या आईवरही हल्ला केला. हार्दिक असे आरोपीचे नाव असून, त्याच्या बहिणीचे नाव हिमाशिखा आणि आईचे नाव नीलिमा असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक आणि हिमाशिखा हे दोघेही २५ वर्षांचे होते आणि गेल्या काही काळापासून गुरुग्राममध्ये इंजिनिअर म्हणून काम करत होते. हिमाशिखा नोकरी सांभाळून एमबीएचे शिक्षणही घेत होती.

तर दुसरीकडे, हार्दिकने साधारण दीड वर्षापूर्वीच आपली नोकरी सोडली होती आणि तो आपला बहुतेक वेळ हा सोशल मीडियावर घालवू लागला होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या वागण्यात मोठा बदल झाला होता आणि तो उशिरा रात्रीपर्यंत मोबाईलवर ऑनलाईन चॅटिंग करत असे, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

पोलीस तपासात असे समोर आलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून हार्दिकची पुण्यातील एका मुस्लिम तरुणीशी मैत्री झाली होती आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. याच कारणावरून बहीण हिमाशिखा आणि आई नीलिमा त्याला वारंवार करिअरवर लक्ष देण्याचा सल्ला देत असत. ६ मार्चच्या संध्याकाळीही याच मुद्द्यावरून बहीण-भावामध्ये वाद सुरू झाला, ज्याचे रूपांतर बघता बघता मोठ्या भांडणात झाले.

रागाच्या भरात हार्दिकने स्वयंपाकघरातील भाजी कापण्याचा चाकू उचलला आणि बहिणीवर सपासप वार केले. गंभीर जखमांमुळे हिमाशिखाचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर चाकूचे ८४ वार झाल्याचे आढळून आले आहे.

बहिणीची हत्या केल्यानंतर हार्दिक हा आई नीलिमा यांच्या ऑफिसमध्ये पोहोचला. नीलिमा एका विमा कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात.

हार्दिकने आईला सांगितले, “घरी चल, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे.” जेव्हा नीलिमा घरी पोहोचल्या, तेव्हा त्यांना आपली मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी आरडाओरडा करताच हार्दिकने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात नीलिमा गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या धोक्याच्या बाहेर आहे.

२४ तासांच्या आत अटक

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी हार्दिकला २४ तासांच्या आत अटक केली. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, कुटुंबीयांकडून त्याला वारंवार करिअरवर लक्ष देण्यास आणि नातेसंबंधांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात होता. यामुळे त्याच्या मनात राग आणि नाराजी साचत गेली होती, ज्यातून त्याने हे भयानक पाऊल उचलले.