नरेंद्र मोदी यांच्या एकहाती कारभारामुळे अडगळीत पडलेले ज्येष्ठ भाजप नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी लोकसभा अध्यक्षपदासाठी आस लावून बसले आहेत. दोन दिवसांपूर्वी डॉ. जोशी यांनी मोदींची भेट घेवून लोकसभा अध्यक्षपद देण्याची विनंती केली होती. तावर अद्याप निर्णय झाला नसल्याने डॉ. मुरलीमनोहर जोशी यांची धाकधूक वाढली आहे.बुधवारपासून सोळाव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु होत आहे. याच अधिवेशनात केंद्र सरकारला लोकसभा अध्यक्ष निवडावा लागेल. लोकसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत इंदौरच्या खासदार सुमित्रा महाजन व आदिवासी नेते करिया मुंडा यांची नावे चर्चेत आहेत. सुमित्रा महाजन यांना लोकसभा अध्यक्ष करण्यासाठी माजी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी मोदींना साकडे घातले होते.
जोशी यांनी काही दिवसांपूर्वी संघ नेत्यांची भेट घेवून मोदी सरकारमध्ये काम करण्यास इच्छूक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर डॉ. जोशी यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती.   लोकसभा अध्यक्ष होण्याची इच्छा डॉ. जोशी यांनी मोदींकडे व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र मोदी यांनी त्यांना कोणतेही आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे काहीसे नाराज झालेल्या जोशींनी याबाबत संघ नेतृत्वाशी चर्चा केली होती. मात्र संघ नेत्यांनी सरळ हात वर करून मोदीच निर्णय घेतील, असा स्पष्ट संदेश जोशींना दिला आहे.

उद्यापासून संसद अधिवेशन
सोळाव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाची तयारी जोरदार सुरु आहे. संसदेत खासदारांसाठी माहिती कक्ष सुरु करण्यात आला आहे. बुधवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात नूतन खासदारांना शपथ दिली जाईल. राष्ट्रपतींचे अभिभाषण, त्यानंतर अभिनंदन प्रस्ताव असा या अधिवेशनाचा कार्यक्रम आहे. ११ जूनला अधिवेशनाची सांगता होईल. लोकसभा अध्यक्षांची निवड होईपर्यंत काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य व माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून काम पाहतील. विजयानंतर दिल्लीत एक-दोनदा येवून गेलेल्या नव्या खासदारांनी स्वीय सहाय्यकाचा शोध सुरु केला आहे. मराठी खासदारांना ‘पीए’ शोधण्यात विशेष अडचण येत आहे. काही खासदारांनी तर ज्यांना पराभूत केले; त्याच माजी खासदारांच्या स्वीय सहाय्यकास पुन्हा नेमले आहे. पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झालेल्या ‘साई’भक्त खासदाराना या इच्छूक स्वीय सहायकांचे टोळके थेट विमानतळावरच घ्यायला गेले होते. कुणी खासदार साहेबांची बॅग उचलत होते तर कुणी मोबाईल सांभाळत होते. त्यामुळे खासदारांनादेखील आपण दिल्लीतदेखील ‘साहेब’ आहोत, असे वाटत होते. केंद्रीय मंत्र्याकडे वैयक्तीक अनुभागात (पर्सनल स्टाफ) पद मिळवण्यासाठी कित्येक ‘सीवी’ आले आहेत. वैयक्तीत अनुभागात नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवड करण्याचा अधिकार मंत्र्याला होता. यंदा मात्र मोदींच्या हाती सारी सूत्रे एकवटल्याने ‘सीवी’ धाडणाऱ्यांना अनेक मंत्री ‘आमच्या हातात काही नाही’, असे सांगत आहेत.