नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री,  ज्येष्ठ नेते, तसेच भाजप समर्थक प्रादेशिक पक्षांचे सदस्य अशा अनेक मान्यवरांच्या साक्षीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी संसदेत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानिमित्ताने भाजपने शक्तिप्रदर्शन करून विरोधकांना आव्हान दिले. 

ओडिशातील आदिवासी समाजातील मुर्मू यांनी उमेदवारी अर्जाचे ४ संच निवडणूक अधिकारी व राज्यसभा सचिवालयाचे महासचिव पी. सी. मोदी यांच्याकडे दाखल केले. प्रत्येक संचामध्ये १२० अनुमोदकांची नावे असून प्रत्येकी ६० प्रस्तावक व अनुमोदक आहेत.

 पहिल्या संचामध्ये पंतप्रधान मोदी प्रस्तावक व  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह अनुमोदक आहेत. भाजपच्या संसदीय मंडळाचे सदस्य, केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री प्रस्तावक व अनुमोदक आहेत. दुसऱ्या संचामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा-शर्मा तसेच, भाजप व ‘एनडीए’च्या घटक पक्षांचे अन्य मुख्यमंत्री प्रस्तावक आहेत. तिसऱ्या व चौथ्या संचामध्ये अनुक्रमे हिमाचल, हरियाणातील व गुजरातमधील भाजपचे आमदार प्रस्तावक व अनुमोदक आहेत.

हे मान्यवर उपस्थित

  •   पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, पीयूष गोयल, गजेंद्रसिंह शेखावत, प्रल्हाद जोशी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा.
  •   मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, हिमंत बिस्वा शर्मा, प्रमोद सावंत, पुष्कर धामी.
  •   घटक पक्षातील अण्णाद्रमुकचे नेते ओ. पनीरसील्वम व एम. थम्बीदुराई. जनता दल (सं)चे राजीव रंजन, वायएसआर काँग्रेसचे विजयसाई रेड्डी, बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा. 

‘वायएसआर’ काँग्रेसचाही पाठिंबा

या संचांमध्ये ‘एनडीए’त नसलेल्या बिजू जनता दल व वायएसआर काँग्रेसचे सदस्य प्रस्तावक असल्यामुळे या दोन्ही पक्षांचा मुर्मूना पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले. विरोधकांच्या उमेदवाराला पाठिंबा देणारा झारखंड मुक्ती मोर्चाही मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. भाजपप्रणित आघाडीकडे एकूण ५४ टक्के मतमूल्य असून विरोधकांकडील मतमूल्य ४६ टक्के आहे. त्यामुळे मुर्मू यांचा विजय सोपा झाला असून त्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असतील.

मुर्मू यांचा सोनिया, पवार यांना दूरध्वनी

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना फोन करून पाठिंबा देण्याची विनंती केली. ‘एनडीए’तील घटक पक्षांचे प्रमुख व आमदार-खासदारांचे समर्थन मिळवण्यासाठी मुर्मू देशव्यापी दौरा करतील. विरोधकांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा २७ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल.