पीटीआय, लखनौ : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाने (बसप) घेतला आहे. पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी लखनौत सांगितले, की आमचा पक्ष राष्ट्रपती निवडणुकीबाबत निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. आमच्या पक्षाच्या चळवळीत आदिवासी समाजाला विशेष स्थान आहे. पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत असा निर्णय आम्ही घेत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मायावती यांनी सांगितले, की आदिवासी समाजातील सक्षम व मेहनती महिला देशाच्या राष्ट्रपतिपदी असाव्यात म्हणून बसपने मुर्मू यांना पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्या कोणत्याही दबावाशिवाय काम करू शकतील का, हे आगामी काळच सांगेल. कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या सरकारने आदिवासींच्या हितासाठी योग्य निर्णय घेतला, तर बसपला मोठे मोल चुकवावे लागले तरी आम्ही दबाव, भीती न बाळगता विनासंकोच पाठिंबा देतो.

मायावती म्हणाल्या की, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधक जनहितार्थ एकत्र काम करतच नसून एकजुटीचा ढोंगीपणा करत आहेत. याचे दुष्परिणामही सर्वाना ठाऊक आहेतच. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षांसह विरोधी पक्षांनी विधानसभा निवडणुकीत बसप ही भाजपची ‘बी टीम’ असल्याचा अपप्रचार करून बसपचे खूप नुकसान केले. या पक्षांनी एका विशिष्ट समुदायाला त्यांच्या बाजूने आणण्यासाठी बसपबाबत जनतेची दिशाभूल केली. परंतु अखेर समाजवादी पक्ष निवडणुकीत विजय मिळवू शकला नाही. राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आला. बसप हा ‘एनडीए’ किंवा ‘यूपीए’चे अंधानुकरण करणारा नाही. आम्ही इतर पक्षांप्रमाणे भांडवलदारांची गुलामगिरीही करत नाही, असेही मायावतींनी या वेळी स्पष्ट केले.

‘विरोधकांच्या आघाडीची मनमानी’ 

राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडताना बसपशी विरोधकांनी कोणतीही चर्चा-विचारविनिमय न केल्याचा आरोप करून, मायावती म्हणाल्या, की त्यामुळे या निवडणुकीबाबत बसप स्वत:चा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २१ जूनला बोलावलेल्या बैठकीला बसपला निमंत्रण न दिल्याचा संदर्भ देत मायावती यांनी सांगितले, की भाजपने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चा उमेदवार एकमताने ठरवण्याचे नाटक केले, तर विरोधी पक्षांनी संयुक्तपणे उमेदवार निवडण्यात मनमानी दाखवली. विरोधी पक्षांनी उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेपासून बसपला अलिप्त ठेवले, यातून त्यांची जातीयवादी मानसिकता स्पष्ट होते. तरीही बसप जनहितासाठी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murmu presidency mayawati announcement opponents accused hypocrisy ysh
First published on: 26-06-2022 at 00:02 IST