Supreme Court Vande Mataram Row news updates: वंदे मातरमची सहा कडवी गायली जावीत, असा कायदा केंद्र सरकारने केला होता. या कायद्याला कर्नाटकचे संगीतकार टीएम कृष्णा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. टीएम कृष्णा यांचे म्हणणे आहे की, वंदे मातरमच्या चार कडव्यांमध्ये स्पष्टपणे हिंदू देवदेवतांप्रती भक्तीभाव व्यक्त करण्यात आलेला आहे. ही कडवी अनिवार्य करणे हे राष्ट्राच्या धर्मनिरपेक्ष संकल्पनेचे उल्लंघन आहे. कृष्णा यांच्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे उत्तर मागितले आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची, न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर टीएम कृष्णा यांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकील एस. मुरलीधर यांच्या युक्तिवादाची दखल घेतली. या कायद्याच्या पैलूंचा विचार केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
लाईव्ह लॉने दिलेल्या बातमीनुसार, या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी म्हटले की, वंदे मातरम आपले राष्ट्रीय गीत आहे, यात कोणतीही शंका नाही. मात्र याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद मान्य करताना लोकांच्या सूचना-हरकती घ्यायला हव्या होत्या, ही बाबही मान्य केली. यानंतर खंडपीठाने केंद्र सरकारला उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान खंडपीठाने तोंडी निरीक्षण नोंदवल्याचे वृत्त लाईव्ह लॉने दिले आहे. राष्ट्रीय गीत काय आहे, हे ठरवणे न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. तथापि, बिजोय इमॅन्युएल प्रकरणात मान्यता दिल्याप्रमाणे सद्सदविवेकबुद्धीने विरोध करणाऱ्या व्यक्तीचा न गाण्याचा अधिकार संरक्षित आहे की नाही, हे तपासले गेले पाहिजे. बिजोय इमॅन्युएल प्रकरणाचा दाखला देत सर्वोच्च न्यायालयाने ‘वंदे मातरम न गाणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाण्याची अपेक्षा नाही’, असे स्पष्ट केले. यासाठी संविधानाच्या अनुच्छेद २५ आणि २६ चा दाखला दिला गेला.
‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताचा अपमान हा फौजदारी गुन्हा ठरवण्याची तरतूद असलेले ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, १९७१’ या कायद्यात सुधारणा करून नवे विधेयक जुलै २०२६ मध्ये संसदेत मंजूर झाले. या नव्या सुधारणेनुसार वंदे मातरम न गाणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
बिजोय इमॅन्युएल प्रकरण काय आहे?
राष्ट्रगीताच्या अवमानाचे प्रकरण जेव्हा जेव्हा समोर येते, तेव्हा १९८६ सालातील सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या ‘बिजोय इमॅन्युएल आणि इतर विरुद्ध केरळ राज्य आणि इतर’ या प्रकरणाचा दाखला दिला जातो. १९८६ साली केरळमधील तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत न बोलल्याबद्दल शाळेने त्यांना काढून टाकले होते. या तीनही विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाच्या धार्मिक परंपरेचा हवाला देऊन राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला होता. ही तीन विद्यार्थी भावंडे असून, त्यातील मोठ्या भावाचे नाव बिजोय इमॅन्युएल होते. त्यामुळे या प्रकरणाला त्याचेच नाव पडले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, विद्यार्थ्यांना बळजबरीने राष्ट्रगीत गायला लावणे म्हणजे घटनेने कलम २५ मध्ये दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे हनन होण्यासारखे आहे.
नव्या विधेयकातील तरतुदी
प्रस्तावित विधेयकानुसार, ‘वंदे मातरम’चा जाणीवपूर्वक अपमान करणे, त्याचे गायन रोखणे किंवा गीत सुरू असताना जाणूनबुजून व्यत्यय आणणे हा गुन्हा मानला जाईल. अशा प्रकरणात दोषी आढळणाऱ्याला तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. राष्ट्रीय गीताचा जाणीवपूर्वक अपमान करणे, ‘वंदे मातरम’चे गायन मुद्दाम रोखणे. गीत सुरू असताना जाणूनबुजून गोंधळ किंवा व्यत्यय निर्माण करणे या तीन कृती दंडनीय ठरतील. या विधेयकानुसार, एखादी व्यक्ती राष्ट्रीय सन्मानाशी संबंधित गुन्ह्यात दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर दोषी ठरल्यास, तिला किमान एक वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा होऊ शकते.
