एपी, लंडन : प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ खरेदी करार तात्पुरता स्थगित केल्याचे ‘ट्विट’ करून शुक्रवारी सर्वाना धक्का दिला. ‘ट्विटर’वर सध्या असलेल्या ‘स्पॅम’ आणि बनावट खात्यांची तपशीलवार माहिती अद्याप ‘ट्विटर’कडून आपल्याला मिळाली नसल्याने हा खरेदी करार स्थगित केल्याचे मस्क यांनी नमूद केले.
‘ट्विटर’ने गुरुवारी दोन शीर्षस्थ व्यवस्थापकांना कार्यमुक्त केले होते. मस्क यांच्या नियोजित ‘ट्विटर’ खरेदीमुळे या कंपनीत गोंधळाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर मस्क यांनी ही नवी घोषणा केल्याने या प्रकरणाला अनपेक्षित नवेच वळण मिळाले.
जागतिक स्तरावरील सर्वात महत्त्वाचा वाहनउत्पादक म्हणून मस्क यांच्याकडे पाहिले जाते. ट्विटर खरेदी केल्यास त्यांचे लक्ष वाहननिर्मिती उद्योगापासून विचलित होण्याची शक्यता अनेकांना वाटते. त्यामुळे गुंतवणूकदार मस्क यांच्यासमोर कायदेशीर अडचणी निर्माण करू शकतात. ट्विटरने गुरुवारी एका निवेदनात नमूद केले, की महत्त्वाच्या व्यावसायिक पदांचा अपवाद वगळता कंपनी बहुतेक भरतीप्रक्रिया स्थगित करत आहे. आपली कार्यक्षमता आणि जबाबदारी अधोरेखित करण्यासाठी कंपनी गैरकर्मचारी खर्चास लगाम घालत आहे.
‘ट्विटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अगरवाल यांनी कर्मचाऱ्यांना एक पत्र दिल्याच्या वृत्तास दुजोरा देताना सांगितले, की कंपनीने आक्रमक पद्धतीने आपले वापरकर्ते आणि उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणूक केली मात्र कंपनीला अपेक्षित विस्तार आणि उत्पन्नवाढीचा टप्पा गाठता आलेला नाही.
‘ट्विटर’ समभागांची घसरण, ‘टेस्ला’ची वृद्धी
बनावट ‘ट्विटर’ खात्यांच्या प्रश्नावरून हा खरेदी करार फिसकटेल की नाही, याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याचे प्रतििबब शेअरबाजारावर शुक्रवारी पडलेच. ‘ट्विटर’चे शेअर १८ टक्क्यांनी घसरले. ‘टेस्ला’चा निधी ‘ट्विटर’ खरेदीसाठी वापरणार असे मस्क यांनी जाहीर केले होते. मात्र, मस्क यांच्या नव्या घोषणेने ‘टेस्ला’चे शेअर पाच टक्क्यांनी वधारले.