मुस्लिम समुदायाने पुढे येऊन मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमीवरील ‘सफेद भवन’ हिंदूंच्या ताब्यात द्यावी, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी केलंय. न्यायालयाने अयोध्या प्रकरणाचे निराकरण केले असताना, काशी (वाराणसी) आणि मथुरा येथील पांढऱ्या इमारती हिंदूंना दुखावतात. दोन ठिकाणच्या मुस्लिम धार्मिक संरचनांचा संदर्भ देत शुक्ला यांनी हे विधान केलंय.

“एक वेळ येईल जेव्हा मथुरेतील प्रत्येक हिंदूला दुखावणाऱ्या पांढऱ्या इमारती न्यायालयाच्या मदतीने हटवल्या जाईल. डॉ, राम मनोहर लोहिया म्हणाले होते की भारतातील मुस्लिमांना राम आणि कृष्ण हे त्यांचे पूर्वज मानावे लागतील आणि बाबर, अकबर आणि औरंगजेब हे हल्लेखोर होते हे मानावे लागेल. त्यामुळे त्यांनी बांधलेल्या कोणत्याही इमारतीशी स्वतःला जोडू नका,” असे संसदीय कामकाज राज्यमंत्री शुक्ला यांनी सोमवारी सांगितले. “मुस्लिम समाजाने पुढे येऊन मथुरेच्या श्री कृष्ण जन्मभूमी संकुलात असलेले सफेद भवन हिंदूंच्या ताब्यात द्यावे. एक वेळ अशी येईल, जेव्हा या इमारती मुस्लिमांनी हिंदुंच्या ताब्यात दिलेल्या असेल,” असंही ते म्हणाले. न्यूज १८ने यासंदर्भात वृत्त दिलंय.

“६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी प्रभू श्रीरामांवर लागलेला डाग काढून टाकला होता आणि आता तेथे भव्य मंदिर बांधले जात आहे. शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांना हिंदू धर्म स्वीकारल्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली. मुस्लिमांनी घर वापसी करत हिंदू धर्मात परत यायला हवे,” असंही ते म्हणाले.

“देशातील सर्व मुस्लीम धर्मांतरित आहेत. त्यांचा इतिहास पाहिला, तर त्यांच्या लक्षात येईल की २००-२५० वर्षांपूर्वी त्यांनी हिंदू धर्मातून इस्लाम स्वीकारला. आम्हाला या सर्वांना घर वापसी करायला लावायला आवडेल. भारताची मूळ संस्कृती ‘हिंदुत्व’ (हिंदू धर्म) आणि ‘भारतीयता’ असून ते एकमेकांना पूरक आहेत,” असे शुक्ला म्हणाले.