scorecardresearch

पैदाशीविना गाईगुरांची कत्तल थांबवण्याची मुस्लीम संघटनेची उत्तर प्रदेशात मागणी ;दारूबंदीचाही आग्रह

उत्तर प्रदेशात दारू विकली गेली तर ती तीर्थक्षेत्री विकली जात आहे.

liqur ban
मद्यविक्रीतून दरवर्षी जमा होणारा सात हजार कोटींचा महसूल बुडण्याची शक्यता निर्माण झाली.
मुंबईत अलीकडेच मांसबंदीचा विषय जैनांच्या पर्यूषण पर्व काळात गाजला असतानाच उत्तर प्रदेशातील एका मुस्लीम संघटनेने त्या राज्यात दारूबंदी व गाईगुरांच्या कत्तलीवर बंदीची मागणी केली आहे. उत्तर प्रदेश हे हिंदूू व मुस्लिमांसाठी तीर्थक्षेत्र असून येथे दारूबंदी तर करावीच, पण गाईगुरांची कत्तलही थांबवावी, अशी मागणी ‘इत्तेहाद ए मिल्लत’ या संघटनेने केली आहे. गाईगुरांची कत्तल करताना त्यांच्या पैदाशीकडे लक्ष दिले जात नाही, त्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. दारूचे सेवन हे सर्व धर्मात निषिद्ध मानले असून उत्तर प्रदेश ही हिंदू व मुस्लिमांसाठी पवित्र भूमी असल्याने दारूबंदी लागू करावी, असे मत या संघटनेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा खान यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील बरेली हे ठिकाण सुन्नी पंथीयांसाठी महत्त्वाचे असून आमच्यात श्रद्धेला महत्त्व आहे असे सांगून ते म्हणाले की, उत्तर प्रदेशात दारू विकली गेली तर ती तीर्थक्षेत्री विकली जात आहे. खान यांनी असा दावा केला की, आपण मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी याबाबत बोललो आहोत. राज्यात दारू सर्रास उपलब्ध आहे, अल्पवयीन मुलांनाही ती उपलब्ध आहे. ज्यूस स्टॉलवर मुले दारू पिताना आपण पाहिली आहेत. जर उत्तर प्रदेशात दारू बंदी केली तर हिंदू व मुस्लीम बांधव त्याचे स्वागतच करतील. दारूबंदीमुळे महसूल बुडतो हे तर्कट बरोबर नाही. धर्माची जी हानी होते त्याचे काय करायचे याचे उत्तर द्यायला हवे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे पण तिथे महसुलावर काही परिणाम झालेला नाही. महात्मा गांधींच्या जन्मभूमीत जर दारूबंदी असेल तर रामकृष्णांच्या भूमीत ती का असू नये? दारू विक्री पूर्ण थांबवता आली नाही तरी किमान अल्पवयीन मुलांना तरी ती उपलब्ध होऊ नये. इस्लाम धर्मात दारू ही वाईट मानली जाते. खून, बलात्कार, दरोडे याला दारूबंदीमुळे आळा बसेल. पंचायत निवडणुका झाल्यानंतर आमची संस्था दारूबंदीसाठी प्रचार करेल. राजकीय रंग येईल म्हणून सध्या आम्ही तसे करीत नाही. गाईगुरांच्या सर्रास कत्तलीबाबत त्यांनी सांगितले की, गाई-म्हशींचे मांस भारतातून मोठय़ा प्रमाणाक निर्यात होते, पण यात कुक्कुटपालनासारखी प्रजोत्पादनाची व्यवस्था नाही. प्रत्येक कत्तलखान्याकडे गाई- गुरांचे प्रजोत्पादन गृह असले पाहिजे, ते नसतानाही त्यांची कत्तल सुरू आहे. अशीच स्थिती राहिली तर काही दिवसांनी आपल्या मुलांना दूधच मिळणार नाही. याआधी, समाजवादी पक्षाचे आमदार जमीरउल्लखान यांनी ‘गाय बचाव’ आंदोलन केले होते. मांस व इतर कारणांसाठी गाईंची कत्तल करू नका, असे आवाहन त्यांनी मुस्लीम समुदायाला केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Muslim outfit demands ban on liquor in uttar pradesh

ताज्या बातम्या