इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांचा निर्णय
इंग्रजी भाषा चाचणी परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या स्थलांतरित महिलांना थेट मायदेशाचा रस्ता दाखविण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला आहे. पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे वर्षांनुवर्षे इंग्लंडमध्ये राहणाऱ्या शेकडो स्त्रिया आपल्या कुटुंबीयांपासून दुरावण्याची भीती निर्माण झाली आहे.
इंग्लंडमध्ये आपल्या पती अथवा जोडीदारासमवेत स्थलांतरित होणाऱ्या प्रत्येक स्त्रीला अडीच वर्षांनंतर या भाषा चाचणीला सामोरे जावे लागेल. त्यात उत्तीर्ण न झाल्यास त्यांचा इंग्लंडमधील रहिवास संपुष्टात येऊन त्यांना मायदेशाचा रस्ता धरावा लागेल. कॅमेरून यांनी एका रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या निर्णयाची घोषणा केली. पतीसमवेत इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या आणि माता बनलेल्या महिलांसाठीदेखील हा निर्णय बंधनकारक असेल का, अशी त्यांना विचारणा केली असता त्यांनी तुमची इंग्रजी सुधारलेली नसेल, तर तुम्हाला येथे राहता येण्याची शक्यता नाही, असे उत्तर दिले. स्थलांतरित स्त्रियांचे इंग्रजी सुधारावे, या हेतूने हा कठोर निर्णय घेतल्याचा दावा कॅमेरून यांनी केला. परंतु, एकीकडे अशा प्रकारचा निर्णय घेताना दुसरीकडे स्थलांतरितांसाठीच्या शिकवणीवर्गासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद मात्र घटविण्यात आली आहे. वित्तीय तुटीमुळे हा निधी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कॅमेरून यांनी सांगितले. मुस्लीम स्त्रियांना डोळ्यासमोर ठेवून भाषा चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. जवळपास १ लाख ९० हजार मुस्लीम महिलांना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नसल्याचा सरकारचा दावा आहे. त्यापैकी ३८ हजार जणींना अजिबातच इंग्रजी येत नाही. हा निर्णय येत्या ऑक्टोबरपासून अमलात येईल.