भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुस्लीम समाजातील लोक करोना लसीकरण करुन घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. लसीकरणासंदर्भात मुस्लीम समाजामध्ये अनेक गैरसमज असल्याचंही रावत यांनी म्हटलं आहे. सोमवारी (१४ जून २०२१ रोजी) एका कार्यक्रमादरम्यान रावत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केलं.

“मी मुद्दाम नाव घेतोय पण आपल्या देशातील मुस्लीम समाजातील लोक सध्या लसीकरणापासून दूर राहत आहेत. त्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. ते अजूनही घाबरतायत आणि त्यांच्यात लसीकरणासंदर्भात गैरसमज आहेत,” असं रावत यांनी म्हटलं आहे. जागतिक रक्तदान दिनानिमित्त ऋषिकेश येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रावत यांनी आपलं मत मांडलं. रावत यांनी यावेळी सामाजिक संस्थांनी आणि प्रसारमाध्यमांनी मुस्लीम समाजामध्ये जनजागृती करुन लसीकरण हे धोकादायक नसल्याचा संदेश देण्यात मदत करावी असं आवाहनही केलं.

नक्की वाचा >> “अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास करोना नष्ट होईल”; खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

देशातील ८० टक्के लोकांचं लसीकरण झाल्यानंतरच…

“तुम्ही लस घेतली नाही तर हा विषाणू नष्ट होणार नाही. लस न घेतल्यास या विषाणूचा संसर्ग होऊन एखादी व्यक्ती सुपर स्प्रेडर ठरु शकते. सर्वांनी लसीकरण करुन घेण्यासाठी पुढे यावं असं मी आवाहन करतो,” असं रावत यांनी म्हटलं आहे. तसेच देशातील ८० टक्के लोकांचं लसीकरण झाल्यानंतरच हर्ड इम्युनिटी निर्माण होईल असंही रावत यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> “करोना हे सरकारचं षडयंत्र, मुस्लिमांची लोकसंख्या चितेंची बाब असून, हिंदूंनी ५ ते ६ मुलांना जन्म द्यावा”

पाकिस्तानमधील नियमांचा केला उल्लेख

पाकिस्तान सरकारने लसीकरणासंदर्भातील विचित्र नियम लागू केल्याचा उल्लेखही रावत यांनी केला. पाकिस्तान सरकारने फोन ब्लॉक करणे, वेतन रोखून धरणे यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून लसीकरणासाठी नागरिकांना भाग पाडलं आहे. अशा निर्णयांमुळे लसीकरणासंदर्भात मोठ्याप्रमाणात जनजागृती निर्माण करता येते, असं रावत यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> करोना देवी की जय… रुग्णसंख्या वाढल्याने केली करोना देवीची प्रतिष्ठापना; ४८ दिवस चालणार महायज्ञ

२२ जूनपर्यंत वाढवला करोना कर्फ्यु पण दिलासाही देण्यात आला

उत्तराखंड सरकारने सोमवारी करोना कर्फ्युमध्ये २२ जूनपर्यंत वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली. आरटीपीसीआर चाचणीचा निकाल नकारात्मक असणाऱ्यांना चारधाम यात्रेसाठी परवानगी देण्यात येईल असंही सांगितलं आहे. चामोली जिल्ह्यातील नागरिकांना बद्रीनाथ, तर रुद्रप्रयाग जिल्ह्यातील स्थानिकांना केदारनाथ आणि उत्तरकाशीमधील स्थानिकांना गंगोत्री तसेच यमुनोत्री देवस्थानांना भेट देण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती सरकारी प्रवक्ते सुबोध विनियाल यांनी दिली.

नक्की वाचा >> “मोदी सरकारने शरियतमध्ये हस्तक्षेप केल्याने करोना, चक्रीवादळांसारखी नैसर्गिक संकटं आली”

२२ जूननंतर सरकार अनलॉकचा विचार करु शकतं असंही सुबोध यांनी स्पष्ट केलंय. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यानंतर राज्यातील अनेक देवस्थाने सर्वसमान्यांसाठी बंद करण्यात आली होती. आता टप्प्याटप्प्यात ती पुन्हा सुरु केली जात आहेत.