Mussoorie Delhi software engineer death mystery investigation updates: उत्तराखंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ मसूरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून पतीसोबत सुट्ट्या घालवण्यासाठी आलेल्या एका २७ वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सकाळी झोपेतून उठल्यावर पत्नीच्या नाकातून रक्त येत असल्याचे पतीच्या निदर्शनास आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

पी. राधा गायत्री (वय २७) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती दिल्लीजवळील गुरुग्राम येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होती.

हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ७:२३ वाजण्याच्या सुमारास मसूरी-धानौल्टी रोडवरील एका होमस्टेमधून पोलिसांना फोन आला. खोलीतील एका महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असून ती कोणतीही हालचाल करत नसल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्या तरुणीला मृत घोषित केले.

मृत तरुणीचा पती सौम्य श्रीचरण हा दिल्लीच्या किडवाई नगर भागातील रहिवासी आहे. हे दाम्पत्य मूळचे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील रहिवासी आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे दोघेही शनिवारी दिल्लीहून ऋषिकेशला आले होते. त्यानंतर रविवारी रात्री ११:३० च्या सुमारास ते मसूरी येथील होमस्टेमध्ये पोहोचले. रात्री साडेतीन वाजेपर्यंत दोघे जागे होते आणि त्यानंतर झोपायला गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पती श्रीचरणने पोलिसांना सांगितले की, “सकाळी जेव्हा मला जाग आली, तेव्हा राधाच्या नाकातून रक्त येत होते आणि ती काहीच बोलत नव्हती.”

लग्नाला अवघे काहीच महिने झाले होते अन्…

राधा गायत्री आणि सौम्य श्रीचरण यांचा विवाह गेल्याच वर्षी ८ नोव्हेंबर २०२५ रोजी झाला होता. दोघेही आयटी क्षेत्रात कार्यरत होते. पती श्रीचरण हा पुण्यात तर मृत राधा ही गुरुग्राममध्ये नोकरीला होती. लग्नानंतर सुट्ट्या घालवण्यासाठी ते उत्तराखंडला आले होते. या घटनेची माहिती मिळताच दोघांच्याही कुटुंबीयांनी तातडीने उत्तराखंड गाठले आहे.

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा; पोलिसांकडून चौकशी सुरू…

या घटनेनंतर डेहराडूनच्या ‘फील्ड युनिट’ला (फॉरेन्सिक टीम) पाचारण करण्यात आले असून, मसूरीच्या नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह डेहराडूनच्या कोरोनेशन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी (Post-Mortem) पाठवण्यात आला.

“राधाच्या वडिलांनी सध्या कोणाविरुद्धही तक्रार दाखल केलेली नाही. आम्ही तिच्या वैद्यकीय इतिहासाची चौकशी करत आहोत. तिला कमी रक्तदाबाचा त्रास होता आणि त्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.”– देवेंद्र सिंह चौहान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मसूरी पोलीस ठाणे</p>

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्यामध्ये काही वाद किंवा तणाव होता का, हे जाणून घेण्यासाठी होमस्टेमधील इतर पर्यटकांची आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप तरी तसा कोणताही संशयास्पद संकेत मिळालेला नाही. मृतदेहावर कोणत्याही बाह्य जखमांच्या खुणा आढळलेल्या नाहीत. नाकातून रक्त येण्याचे अचूक कारण शवविच्छेदन अहवाल (पोस्टमार्टम रिपोर्ट) आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.