३१ डिसेंबरपर्यंत डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तुम्ही अपग्रेड करून बदलले नाही तर आत्ता जे कार्ड वापरत आहात ते बाद होणार आहे. तुमच्या खात्यात तुमचे पैसे सुरक्षित राहिले पाहिजेत. ऑनलाइन फ्रॉडद्वारे ते चोरीला जाऊ नयेत म्हणून आरबीआयने यासंदर्भातले निर्देश बँकांना दिले आहेत. खातेदारांचे पैसे, ठेवी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बँकेची आहे. त्यामुळे नव्या डेबिट कार्डांना विशिष्ट चीप्स लावण्यात आल्या आहेत. ज्यामुळे तुमची एटीएममधून पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी आणि जास्त सुरक्षित होणार आहे.
सध्या आपण वापरत असलेल्या बहुतांश क्रेडिट आणि डेबिट कार्ड्समध्ये मॅग्नेटिक स्ट्राइप आहे. त्यामुळे ही कार्ड्स क्लोन करून त्याआधारे तुमच्या अकाऊंटमधले पैसे लंपास करणे चोरांना सहज सोपे आहे. असे घडू नये म्हणून EVM चीप असलेली कार्ड्स बँका आपल्या खातेदारांना देणार आहे. ३१ डिसेंबरनंतर जुनी कार्ड्स एटीएममध्ये चालणार नाहीत. त्यामुळे ती त्याआधी अपग्रेड करणे गजचेचे आहे. सध्या वापरत असलेले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नव्या कार्डमध्ये अपग्रेड करण्यासाठी बँकेकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. EVM चीप असलेली क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स २०१६ पासून वापरात आहेत. आता मात्र ही कार्ड्स बँकांनी सगळ्या खातेदारांना देणे बंधनकारक आहे.