Muzaffarnagar Horror: उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे मुस्कान रस्तोगी नामक महिलेने प्रियकरासाठी स्वतःच्या नवऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये काँक्रिटसह पुरला होता. आता उत्तर प्रदेशच्याच मुझफ्फरनगरमध्ये मुस्कान नावाच्या आणखी एका महिलेनं धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या महिलेनं कौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या असून प्रियकर जुनैदबरोबर आयुष्य घालवता यावं, म्हणून माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं. पोलिसांनी आता आईला अटक केली असून तिच्या फरार प्रियकराचा शोध सुरू आहे.
नेमके प्रकरण काय?
मुझफ्फरनगरच्या रुडकाली गावात १९ जून रोजी दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा ५ वर्षीय अरहान आणि एक वर्षाची इनाया मृतावस्थेत आढळून आले. मृत मुलांचे वडील वसीम हे कामानिमित्त चंदीगडला गेले होते. तर घरी २४ वर्षीय आई मुस्कान आणि मुलंच असायचे. मुलांच्या शरीरावर कोणत्याही जखमा पोलिसांना आढळल्या नाहीत. पोलिसांनी जेव्हा मुस्कानची चौकशी केली तेव्हा तिनं मुलांना सकाळी नाश्त्यात चहा आणि बिस्किटे दिल्याचं सांगितलं.
पोलिसांना संशय आल्यामुळं त्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले. याचा अहवाल आल्यानंतर मुलांना विष देऊन मारल्याचे समोर आलं. यानंतर पोलिसांनी आई मुस्कानची कसून चौकशी केली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. मुस्काननं आपला गुन्हा मान्य केला.
मुस्कान आणि वसीमचं लग्न ७ वर्षांपूर्वी झालं होतं. मात्र गेल्या दोन वर्षांपासून वसीम क्षयरोगानं ग्रस्त आहे. यानंतर मुस्कानच्या आयुष्यात जुनैद नावाच्या युवकाची एंट्री झाली. जुनैद हा मुस्कानचा नातेवाईक असल्याचं सांगितलं जातं.
पोलिसांच्या चौकशीत कळलं की, जुनैदनं मुस्कानला बाहेरून रसगुल्ले आणून दिले. त्यात मुस्काननं विषारी गोळ्या टाकून मुलांना खायला दिलं. यामुळं दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी जुनैद मुस्कानच्या घरातच थांबला होता. पोलीस आता पुरावे गोळा करण्यात गुंतले आहेत. विष कुठून विकत घेतलं, याचा तपास केला जात आहे.
पोलिसांनी दोन्ही आरोपींचा मोबाइल जप्त केला असून सीडीआरची तपासमी केली जाणार आहे.