scorecardresearch

“…त्यांना माझी हत्या करायचीय!” पाकिस्तानचे माजी पंतप्रधान म्हणाले, “अटकेची तयारी हा लंडन योजनेचा भाग”

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या लाहोर येथील घराबाहेर दाखल झाले आहेत.

imran khan on arrest
पाकिस्तानात सध्या गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. (PC : Twitter/@ImranKhanPTI)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी विद्यमान सरकारवर आरोप करत म्हटलं आहे की, “माझ्या अटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. माझ्या अटकेची तयारी देशाचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरोधात सुरू असलेले सर्व खटले थांबवण्यासाठी, त्यांच्यावरील आरोप हटवण्यासाठी सुरू असलेल्या लंडन योजनेचा भाग आहे.”

इम्रान खान यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “देशात जे काही सुरू आहे तो लंडन योजनेचा भाग आहे. या योजनेअंतर्गत मला तुरुंगात टाकण्याचा, पीटीआय पक्षाला हरवण्याचा आणि नवाज शरीफ यांच्याविरोधातील सर्व प्रकरणं संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी एक विशेष करार झाला आहे. त्यावर माझ्या विरोधकांनी सह्या केल्या आहेत.”

इम्रान खान म्हणाले की, “मला लोकांवरील हल्ल्यांमागची कारणं समजली नाहीत. कारण मी आधीच आश्वासन दिलं होतं की, ते १८ मार्च रोजी न्यायालयात हजर होईन.” बुधवारी पहाटे लाहोरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेलं असताना इम्रान खान यांचा हा व्हिडीओ समोर आला आहे. खान म्हणाले की, “माझ्या अटकेसाठी घराबाहेर (जमान पार्क येथील निवासस्थानी) अधिक सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले आहे.” दरम्यान, पोलीस आणि इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. अनेकवेळा पोलीस आणि पीटीआय कार्यकर्ते समोरासमोर आल्याने लाहोरमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

हे ही वाचा >> “आजूबाजूच्या चमच्यांमुळे मुख्यमंत्री शिंदे त्रस्त”; जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले, “मी त्यांना जवळून…”

माझ्या हत्येचा कट : इम्रान खान

दरम्यान, इम्रान खान म्हणाले की, “पाकिस्तानमधील पोलिसांचा खरा कट हा मला केवळ तुरुंगात टाकण्याचा नव्हे तर त्यांना माझं अपहरण करून हत्या करायची आहे. अटकेची योजना हे केवळ एक नाटक आहे. मला संपवणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 14:38 IST