Indian student confronts Nvidia exec: न्यूयॉर्कमधील क्लायमेट विक कार्यक्रमात वातावरण बदलावर चर्चा सुरू असताना भारतीय विद्यार्थ्यासहीत काहींनी गोंधळ घातल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चिप्स तयार करण्यात आघाडीवर असलेल्या ‘एनव्हिडिया’ (Nvidia) कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला या कार्यक्रमात थेट जाब विचारण्यात आला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सेंटर्स आणि त्यासाठी लागणारे पाणी आणि ऊर्जा यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या प्रतिकूल बदलांची यानिमित्ताने पुन्हा चर्चा होत आहे.
२३ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये एनव्हिडिया कंपनीचे सस्टेनेबिलिटी प्रमुख जोश पार्कर यांच्या उपस्थितीत परिसंवाद सुरू होता. यावेळी काही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. अल जझीराने यासंबंधीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात विद्यार्थी एकामागोमाग उठून घोषणाबाजी करताना दिसतात. एआयच्या पायाभूत सुविधांचा विकास होत असताना त्याचा पर्यावरणावर वेगाने परिणाम होत असल्याची बाब प्रकर्षाने पुन्हा मांडली जात आहे.
भारतात सध्या अनेक राज्यात दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे. भारतावर ओढवलेली दुष्काळाची परिस्थिती ही याच कारणामुळे आल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.
एक विद्यार्थी परिसंवाद सुरू असताना उभा राहून घोषणा देताना म्हणतो, “पार्कर तुम्हाला लाज वाटायला हवी. तुमच्यामुळे भारतातील आमचे कुटुंब दुष्काळामुळे मरत आहे. आणखी किती लोक याचे बळी ठरणार आहेत? तुम्हाला खरंच सस्टेनेबिलिटीची चिंता आहे का? तुम्ही १५ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन केले आहे.” यानंतर या विद्यार्थ्याला सुरक्षा रक्षक बाहेर काढताना दिसत आहेत.
‘एआय’ची किंमत पर्यावरणाला मोजावी लागतेय’
या परिसंवादाच्या कार्यक्रमादरम्यान अनेक आंदोलक घोषणाबाजी करून खंड पाडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तंत्रज्ञान क्षेत्राकडून सस्टेनेबिलिटीच्या दाव्याला आंदोलकांनी फेटाळून लावले. आणखी एका आंदोलकाने डेटा सेंटर्स आणि मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांवर हवामान संकट गंभीर केल्याचा आरोप केला. “डेटा सेंटर्स आणि एआयचे गंभीर परिणाम काही लोकांना भोगावे लागत असताना तुम्ही इथे कसे काय शांतपणे बसू शकता. हवामान संकटाला डेटा सेंटर्स कारणीभूत आहेत”, असा दावा दुसऱ्या एका आंदोलकाने केला.
तिसऱ्या एका आंदोलकाने एनव्हिडियाच्या इस्रायलशी असलेल्या व्यावसायिक हितसंबंधांवरही टीका केली. त्याने आरोप केला की, इस्रायलने कंपनीच्या एआय चीप्स लष्करासाठी वापरल्या.
मनीकंट्रोलने दिलेल्या बातमीनुसार, सनराईज मुव्हमेंटशी निगडित सदस्यांनी परिसंवादादरम्यान हे आंदोलन केले होते. सोशल मीडियावर या व्हिडीओच्या निमित्ताने पर्यावरण बदलावर चर्चा होत आहे. अनेकांनी आंदोलकांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एआय डेटा सेंटर्ससाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. ज्यात ८० टक्के पाणी बाष्पीभवनातून थंडावा निर्माण करण्यासाठी वापरले जाते. या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, एआय इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ४.२ ते ६.६ अब्ज क्युबिक मीटर इतके पाणी २०२७ मध्ये लागू शकते.
डाउन टू अर्थने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील जवळपास तीन-चतुर्थांश डेटा सेंटर्स पाणीटंचाई असलेल्या प्रदेशांमध्ये आहेत. ज्यात बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबादसारख्या शहरांचा समावेश आहे. याठिकाणी पाणी हा गंभीर प्रश्न बनला आहे.
