गेल्या काही दिवसांपासून अभिनेता संजय दत्त अडचणीच्या परिस्थितीतून जात असताना त्याची मोठी मुलगी त्रिशाला त्याच्यासोबत न दिसल्यामुळे वेगवेगळे प्रश्न विचारणाऱयांना त्रिशालाने आपल्या ब्लॉगमधून उत्तर दिलंय. वडिलांनी सांगितल्यामुळेच मी मुंबईत आले नाही. आमचे सगळं कुटुंब अडचणीच्या परिस्थितीतून जात असताना मला मुंबईत येऊन नको त्या प्रश्नांना उत्तरं द्यायची नव्हती, असे त्रिशालाने ब्लॉगवर लिहिलंय
१९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी संजय दत्त उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी १६ मे रोजी मुंबईतील न्यायालयापुढे शरण आला. संजय दत्तला साडेतीन वर्षे तुरुंगात राहावे लागणार आहे. गेल्या जवळपास दोन-तीन महिन्यांच्या काळात संजय दत्तचे कुटुंब अडचणीच्या स्थितीतून जाते आहे. यावेळी त्याची मोठी मुलगी त्रिशाला त्याच्यासोबत अजिबात न दिसल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. त्याला त्रिशालाने उत्तर दिले.
वडील अडचणीत असताना मी भारतात का आले नाही, असा प्रश्न विचारणाऱयांबद्दल मला दया येते. न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही मी तिथे का फिरकले नाही, असेही प्रश्न विचारले गेले. या सगळ्यावर मी इतकी शांत का, असे म्हणणाऱयांनी थोडासुद्धा सारासार विचार केला नाही. वडिलांनीच मला मुंबईत येऊ नको, असे सांगितले असेल, असे त्यांना वाटले नाही का, असा प्रश्न त्रिशालाने विचारला.
खरंतर, जानेवारी २००७ नंतर मी मुंबईमध्ये आले नाही. २००७ मध्ये जेव्हा आले होते, त्यावेळीसुद्धा माध्यमांनी माझ्याभोवती गराडा घातला होता. आता वडलांना शिक्षा सुनावली असताना पुन्हा मुंबईत आले असते, तर अडचण अजूनच वाढली असती, असे तिने लिहिले आहे.