नोकरीच्या शोधात असताना म्यानमारमध्ये फसलेल्या १३ भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. नोकरीचे आमिष दाखवून त्यांना म्यानमारमध्ये नेण्यात आले होते. त्यांच्याकडून क्रिप्टेकरन्सीशी संबंधित अवैध काम करून घेण्यात आले. सुटका करण्यात आलेले सर्व १३ जण तामिळनाडूमधील आहेत. विशेष म्हणजे कामाचे टार्गेट पूर्ण न झाल्यास त्यांना इलेक्ट्रिक शॉक दिला जात असे. तशी माहिती सुटका करण्यात आलेल्यांपैकी एका व्यक्तीने दिली आहे. नोकरीच्या शोधात असताना मानवी तस्करीस बळी पडलेल्या या भारतीयांची ४ ऑक्टोबर रोजी सुटका करण्यात आली.

हेही वाचा >>> “माझी बायकोही मला एवढं…”, अरविंद केजरीवाल यांचा नायब राज्यपालांना टोला; म्हणाले, “थोडं चिल करा!”

म्यानमारमधून सुटका झालेल्यांमध्ये सी स्टीफन वेस्ली यांचाही समावेश आहे. ते बंगळुरूमध्ये ग्राफिक्स डिझायनर म्हणून काम करायचे. स्टीफन यांनीच या छळवणुकीबद्दल अधिक माहिती दिली आहे. भारतातील काही लोकांना थायलंडमध्ये नोकरीचे देण्याचे आमिष दाखवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र त्यांची फसवणूक करण्यात आली. त्यांना थायलंडमधून म्यानमार देशात अवैधरित्या नेण्यात आले. तसेच म्यानमारमध्ये नेल्यानंतर या भारतीयांकडून क्रिप्टेकरन्सशी संबंधित अवैध काम करून घेण्यात आले. येथे वेगवेगळ्या मॉडेल्सच्या नावाने बनावट खाती तयार करण्यात आली होती. या बनावट खात्यांच्या माध्यमातून डेटिंग अॅपवर नोंदणी केलेल्या मोठ्या उद्योजकांना फसवले जायचे. या उद्योजकांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास भाग पाडले जायचे. या कामासाठी काही महिलांनाही नोकरीवर ठेवण्यात आले होते.

हेही वाचा >>> इन्स्टाग्राम फॉलोअर्सवरुन भांडण, तरुणी म्हणाली “गल्लीत येऊन तर दाखव,” तरुण मित्राला घेऊन पोहोचताच…; परिसरात एकच खळबळ

स्टीफन यांनी दिलेल्या माहितीनुसार हे काम करण्यासाठी प्रत्येकाला ५० लोकांपर्यंत पोहोचण्याचे टार्गेट देण्यात आले होते. दिवसाला या ५० लोकांशी संपर्क साधावा लागत असे. हे टार्गेट पूर्ण न झाल्यास कर्मचाऱ्यांना शिक्षा केली जायची. जो टार्गेट पूर्ण करणार नाही, त्याला इलेक्ट्रिक शॉक दिला जायचा. मानवी तस्करीला बळी पडलेल्यांना थायलंडमध्ये नोकरी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र थायलंडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना एका कारमध्ये बसवून ४५० किलोमीटर पुढे म्यानमारमध्ये नेण्यात आले. तशी माहिती भारतीयांप्रमाणेच मानवी तस्करीस बळी पडलेल्या कोईम्बतूरमधील एका नागरिकाने दिली आहे.