म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आँग ह्लाइंग ५ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणाऱ्या महत्त्वाच्या चर्चेपूर्वी, त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात बिहारमधील बोधगया येथील महाबोधी विहाराला भेट देऊन केली. या भेटीने भारत आणि म्यानमारमधील प्राचीन बौद्ध आणि सांस्कृतिक संबंधांना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.
बोधगयापासूनच सुरुवात का?
बोधगया हे बौद्ध धर्मीयांसाठी जगातील सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे. म्यानमार हा बौद्ध बहुसंख्य देश असल्याने दोन्ही देशांमधील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक बंध अत्यंत घट्ट आहेत. म्हणूनच, कोणतीही राजकीय चर्चा सुरू करण्यापूर्वी राष्ट्रपती ह्लाइंग यांनी महाबोधी विहारात प्रार्थना केली. विमानतळावर बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन (निवृत्त) यांनी त्यांचे स्वागत केले. याबाबतचे वृत्त ‘न्यूज१८’ने प्रसिद्ध केले आहे.
विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ट्विट करत म्हटले, “राष्ट्रपती यू मिन आँग ह्लाइंग यांचे बोधगयात स्वागत आहे. त्यांची ही भेट दोन्ही देशांमधील मजबूत आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि जनतेमधील दृढ संबंधांचे प्रतीक आहे.”
राष्ट्रपती म्हणून पहिलाच भारत दौरा
फेब्रुवारी २०२१ मध्ये म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता हाती घेतली होती, ज्याचे नेतृत्व आँग ह्लाइंग करत होते. मात्र, नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी राष्ट्रपती पदाची सूत्रे हाती घेतली. राष्ट्रपती बनल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह उपस्थित होते.
मोदींसोबतच्या चर्चेत कोणते मुद्दे असणार?
१ जून रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती ह्लाइंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. म्यानमारची सीमा भारताच्या मणिपूर आणि नागालँडसह एकूण १,६४० किलोमीटरला लागून आहे. त्यामुळे या बैठकीत दोन्ही देशांच्या सीमेवरील शांतता आणि सुरक्षेवर चर्चा होईल. पायाभूत सुविधा आणि रस्ते प्रकल्पांना गती देणे.तसेच दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंध आणि लष्करी सहकार्य वाढवणे. भारताच्या ‘शेजारी प्रथम’, अॅक्ट ईस्ट’ आणि हिंदी महासागर क्षेत्रासाठीच्या ‘महासागर’ दृष्टीकोनात म्यानमार हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.
मुंबईचाही दौरा करणार
राष्ट्रपतींसोबत म्यानमारचे कॅबिनेट मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी आणि उद्योगपतींचे एक मोठे शिष्टमंडळ आले आहे. दिल्लीतील बैठकीनंतर २ जून रोजी ते मुंबईला भेट देतील. तिथे ते भारतीय उद्योगपतींची भेट घेऊन व्यापारी करारांवर चर्चा करतील, तसेच प्रमुख औद्योगिक केंद्रांना भेट देणार आहेत.
