मैसुरू सर्वात स्वच्छ, धनबाद सर्वाधिक अस्वच्छ

दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे आणि राज्यांची राजधानी असलेली शहरे यांची ही क्रमवारी आहे.

कर्नाटकातील मैसुरू हे सगळयात स्वच्छ,

‘टॉप टेन’ स्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश, पुणे व नाशिक सर्वेक्षणात गळाली
ऑक्टोबर २०१४ मध्ये देशात स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यानंतर देशातील राजधानीच्या शहरांसह महानगरांची स्वच्छतेची क्रमवारी जाहीर झाली असून, त्यात कर्नाटकातील मैसुरू हे सगळयात स्वच्छ, तर झारखंडमधील धनबाद हे सगळ्यात अस्वच्छ शहर ठरले आहे. मुंबईचा पहिल्या १० स्वच्छ शहरांमध्ये, तर कल्याण-डोंबिवलीचा अस्वच्छ शहरांमध्ये समावेश आहे.
दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे आणि राज्यांची राजधानी असलेली शहरे यांची ही क्रमवारी आहे. सगळ्यात स्वच्छ ठरवण्यात आलेल्या १० शहरांमध्ये चंदीगड, विशाखापट्टणम, सुरत, राजकोट, गंगटोक व बृहन्मुंबईचा समावेश आहे.
याउलट वाराणसी, गाझियाबाद, मीरत, पाटणा व कल्याण-डोंबिवली यांचा सगळ्यात अस्वच्छ अशा पहिल्या १० शहरांत क्रमांक लागला आहे. स्वच्छ भारत अभियानाचे मुख्य घटक, पायाभूत सुविधांची उपलब्धता, तसेच घरगुती स्वच्छतागृहे, सामूहिक स्वच्छतागृहे आणि शहरातील घनकचरा एकत्र करून त्याची वाहतूक व विल्हेवाट लावण्यासारख्या आरोग्याशी संबंधित सेवांचा स्तर या निकषांवर चाचणीचे निकाल लावण्यात आले आहेत.
यापूर्वीचे स्वच्छताविषयक सर्वेक्षण २०१४ साली स्वच्छ भारत अभियान सुरू होण्यापूर्वी करण्यात आले होते. त्यात एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ४७६ शहरांची पाहणी करण्यात येऊन तिचा निकाल २०१५ साली जाहीर करण्यात आला. त्या सर्वेक्षणात १ लाख ते ५० लाखांहून अधिक लोकसंख्येच्या अनेकविध शहरांचा समावेश असला, तरी या वेळची क्रमवारी तुलनात्मक शहरांमध्ये लावण्यात आली आहे. निवडक शहरांमध्ये स्वच्छताविषयक सुविधांचे मोजमाप करणे, या शहरांनी आरोग्यविषयक सोयी सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न, स्वच्छ भारत अभियानाच्या प्रभावाचे मूल्यमापन करणे हा सर्वेक्षणाचा उद्देश होता, असे शहरी विकास मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. २०१४ साली सर्वेक्षण करण्यात आलेल्या ७३ शहरांमध्ये गुणानुक्रमे मैसुरू, बृहन्मुंबई, तिरुचिरापल्ली, चेन्नई, पुणे, नवी मुंबई, नवी दिल्ली महानगर परिषद, नाशिक, पिंपरी चिंचवड व चंदिगड या शहरांचा समावेश होता. यापैकी नवी मुंबई, चेन्नई, पुणे व नाशिक ही चार शहरे २०१६ सालच्या सर्वेक्षणात गळाली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mysore most swachh city dhanbad ranked dirtiest city among