इस्रायलमध्ये पतीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर नैराश्यात गेलेल्या पत्नीने पाच महिन्यानंतर स्वतःचेही जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यातील कोलायाडी येथे राहणाऱ्या रेश्मा (३२) यांनी बुधवारी विष पिऊन जीवनयात्रा संपवली. तिचे पती जिनेश सुकुमारन (३८) इस्रायलमध्ये केअरटेकर म्हणून काम करत होते. मागच्या वर्षी जुलै महिन्यात ते एका अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळले होते.

१० वर्षांची मुलगी झाली पोरकी

रेश्मा यांच्या पश्चात त्यांची १० वर्षांची एक मुलगी आहे. पतीच्या मृत्यूचे गूढ उकलण्यास विलंब होत असल्यामुळे त्या नैराश्यात गेल्या होत्या. जिनेश मे महिन्यात केअरटेकर म्हणून काम करण्यासाठी इस्रायलला गेला होता. जिनेश व्यतिरिक्त ८० वर्षीय महिलाचेही मृतदेह जेरूसलेम शहराबाहेर असलेल्या मेवासेरेट झिओन येथील अपार्टमेंटमध्ये आढळून आला होता. सदर महिलेचा पती अंथरुणाला खिळून होता, त्यांची काळजी घेण्याचे काम जिनेश सुकुमारन करत होता.

जिनेशच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पत्नी रेश्मा इस्रायलच्या यंत्रणेच्या संपर्कात होती. मात्र वृद्ध महिला आणि जिनेशच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. इस्रायलमध्ये जाऊन रेश्माने इस्रायलमधील भारतीय दूतावास कार्यालयाशी संपर्क साधला होता. मात्र दूतावासाने तिला सांगितले की, सदर प्रकरण न्यायालयासमोर आहे. जिनेश अपार्टमेंटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. तर वृद्ध महिलेच्या शरीरावर शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या.

वायनाडमध्ये परतल्यावर रेश्माने केंद्र सरकार तसेच इस्रायली दूतावासाशी संपर्क साधून उत्तर मागितले होते.

कोलायाडी येथील माजी पंचायत सदस्या सुजा जेम्स म्हणाल्या, जिनेशच्या मृत्यूनंतर रेश्मा निराश होती. वृद्ध महिलेची हत्या केल्यानंतर जिनेशने आत्महत्या केली असेल, यावर तिचा अजिबात विश्वास बसत नव्हता. तिने याबाबत अधिकाऱ्यांना अनेक ईमेल पाठवले. पण त्याचे उत्तर मिळाले नाही.

इस्रायलला जाण्यापूर्वी जिनेश एका फार्मा कंपनीत प्रतिनिधी म्हणून काम करत होता. पदवीधर असलेली रेश्मा गृहिणी होती. दोघांनी कोलायाडी येथे नवीन घर बांधले होते. बांधकामाचा खर्च भरून काढण्यासाठी जिनेश इस्रायलला गेला होता. शिवाय त्याने जॉब व्हिसा मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते. यामुळे जिनेश एखाद्याचा खून करून स्वतःचे आयुष्य संपवेल, यावर रेश्माचा बिलकुल विश्वास बसत नव्हता.