scorecardresearch

एन. बिरेन सिंह यांची पुन्हा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी निवड

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६० सदस्यांच्या सभागृहात ३२ जागा जिंकून भाजप पुन्हा सत्तेवर आला आहे.

इंफाळ : एन. बिरेन सिंह हेच दुसऱ्यांदा मणिपूरचे मुख्यमंत्री राहतील, असे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी इंफाळमध्ये जाहीर केले.

भाजपच्या राज्य विधिमंडळ पक्षाने सिंह यांची आपले नेते म्हणून एकमताने निवड केली असल्याचे भाजपने केंद्रीय निरीक्षक म्हणून मणिपूरला पाठवलेल्या सीतारामन यांनी सांगितले.

मणिपूर विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, बिरेन सिंह आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार विश्वजित सिंह हे दोन प्रतिस्पर्धी नेते केंद्रीय नेत्यांना भेटण्यासाठी दोन वेळा दिल्लीला गेले होते. दोन्ही प्रतिस्पर्धी गटांनी आपल्यात मतभेद असल्याचा इन्कार केला असला, तरी त्यांचे हे प्रयत्न म्हणजे मुख्यमंत्रिपदासाठी दबावतंत्र (लॉबिंग) असल्याचे मानले गेले. १० दिवसांच्या अनिश्चिततेनंतर विधिमंडळ पक्षाची बैठक व नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली.  सीतारामन यांच्यासह सह-निरीक्षक आणि केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजिजू हे भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रविवारी सकाळी इंफाळला पोहचले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६० सदस्यांच्या सभागृहात ३२ जागा जिंकून भाजप पुन्हा सत्तेवर आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: N biren singh unanimously elected to be manipur cm again zws

ताज्या बातम्या